जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची धामधूम खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे.  विविध राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली असताना बुधवारी त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश झाला. काँग्रेस व राष्ट्रवादीत आघाडीविषयी चर्चा सुरू असताना दुसरीकडे ही मुलाखतीची प्रक्रिया सुरू असल्याने उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुकही काहीसे बुचकळ्यात पडलेले आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार निवडीसाठी मुलाखतीला सुरूवात झाली. पुढील चार दिवस या मुलाखती सुरू राहणार असून त्यात वशिलेबाजी, ओळखीच्या व्यक्तीला प्राधान्य हे आरोप टाळण्यासाठी पक्षाने तालुका पातळीवर स्थानिक नेतृत्वाला दुसऱ्या तालुक्यात नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट व गणनिहाय कार्यकारिणी तयार करण्यात आली असून येवला, पेठ, नाशिक, कळवण, चांदवड, नांदगाव यासह १३ तालुक्यांसाठी प्रभारी व निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आमदार, माजी आमदार, विधानसभा अध्यक्ष, शहराध्यक्ष आदींचा समावेश निवड समितीमध्ये करण्यात आला आहे.

निवड समिती पात्र उमेदवार ठरवेल. सुरगाणा, पेठ, इगतपुरी आदी ठिकाणी मुलाखती सुरू असून स्थानिक नेतृत्व त्या वेळी प्रभारी व निरीक्षकांसोबत राहील, अशी व्यवस्था केल्याने मुलाखती टप्पा टप्पाने पार पडणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. दरम्यान, मुलाखतीसाठी सुरगाणा येथे प्रभारी म्हणून जिल्हा पदाधिकारी ज्ञानेश्वर फोकणे, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस सचिन पिंगळे, पेठ येथे आ. नरहरी झिरवाळ, जिल्हा पदाधिकारी नामदेव वाघचौरे उपस्थित होते. मुलाखतीत इच्छुक उमेदवाराची सामाजिक व राजकीय पाश्र्वभूमी, पक्षासाठीचे योगदान, आंदोलनातील सहभाग, स्थानिक समस्यांवर केलेले काम व आंदोलन, स्थानिक समस्यांची कितपत जाण आहे आदींची चाचपणी करण्यात आली.