केंद्रीय मंत्रिमंडळात आधी शपथ घेणार नाही, असं सांगून नंतर शिवसेनेनं मंत्रिपद स्वीकारलं. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही एनडीएच्या उमेदवाराला आधी विरोध करणाऱ्या शिवसेनेनं नंतर पाठिंबा दिला. शिवसेना आधीपासूनच विरोधात बोलून मग भाजपच्या निर्णयात सहभागी होते, त्यामुळंच आम्ही दोन तोंडाच्या गांडुळाची उपमा दिली. पण त्याचा त्यांना राग आला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज (ता. १५) नाशिकमध्ये पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समृद्धी महामार्गासाठी शेतकर्‍यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. मात्र शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी भूसंपादन करारावर सह्या केल्या, असेही ते म्हणाले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शेतकर्‍यांचे पैसे स्वीकारायचे नाहीत आणि दुसरीकडे कर्जमाफीसाठी जिल्हा बँकांना पैसेही द्यायचे नाहीत, अशी दुटप्पी भूमिका राज्य सरकारची आहे, अशा शब्दांतही त्यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

बीड जिल्ह्यात एका शेतकर्‍यानं हवामान खात्याविरोधात तक्रार केली असल्याची बातमी वाचली. हवामान खात्यानं यंदा पाऊस चांगला होईल. सरासरी ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. शेतकर्‍यांनी विश्वास ठेवून बि-बियाणे घेतले आणि पेरणी केली. पण पाऊस पडला नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परदेशात हवामानाचे अंदाज अचूक असतात. तंत्रज्ञान इतकं पुढं गेलं तरी आपल्या हवामान खात्याचे अंदाच का चुकत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्याने केलेली तक्रार योग्य असून यातून तरी हवामान खात्याला धडा मिळेल. हवामान खात्याचे अंदाज चुकतात हे आपले अपयश असल्याचेही ते यावेळी म्हणाले. नवमतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळं आम्हीही सोशल मीडिया सेल स्थापन केला. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी या दौर्‍याचे नियोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.