जिल्ह्यतील धरणांमध्ये केवळ २४ टक्के जलसाठा
वातावरणात काहीसा गारवा असला तरी उन्हाळ्यातील संकटाची चाहूल एव्हाना स्पष्टपणे दिसू लागली आहे. जिल्ह्यतील धरणांमध्ये सद्य:स्थितीत केवळ २४ टक्के जलसाठा असून टंचाईच्या गर्तेत सापडणाऱ्या गावांची संख्याही वाढत आहे. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सध्या २२ गावे आणि ९४ वाडय़ांना टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. शहरात पाणीकपातीवरून चाललेले राजकारण अद्याप संपुष्टात आलेले नाही. नाशिक विभागात धुळे जिल्ह्यात दोन, तर जळगावमध्ये १७ गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. हिवाळा संपुष्टात येत असताना ही स्थिती असल्याने उन्हाळ्यात काय होणार, याची चिंता सर्वसामान्यांना भेडसावत आहे.
गंगापूर व दारणा धरणातून मराठवाडय़ासाठी पाणी सोडल्यानंतर शेतीसह शहरी भागात पाण्याचे फेरनियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तथापि, त्यादृष्टीने पावले टाकण्याच्या प्रक्रियेत अडथळे आणत भाजपने आजतागायत नाशिक शहरात कपात लागू होऊ दिलेली नाही. पुढील काही दिवसात या संदर्भात जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते. या काळात पालिका प्रशासनाने आपण कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो ते दाखवून दिले. सर्वसाधारण सभेतील निर्णयाला न जुमानता प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या सूचनेला शिरोधार्य मानत कपातीतून जी काही बचत होऊ शकली असती, त्यावर पाणी फेरले. थंडी निरोप घेण्याच्या मार्गावर असतानाच ग्रामीण भागात टंचाईचे संकट गडद होणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यतील धरणांमध्ये सध्या १५ हजार ८३४ दशलक्ष घनफूट म्हणजे २४ टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २६ टक्क्यांनी कमी आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात एकूण ३२ टक्के जलसाठा आहे. गंगापूर, काश्यपी व गौतमी गोदावरी प्रकल्पात ३०३३ दशलक्ष घनफूट पाणी असून मागील वर्षी या तिन्ही धरणात एकत्रितपणे ७० टक्के जलसाठा होता.
उर्वरित धरणांची स्थिती फारशी समाधानकारक नाही. उन्हाचा तडाखा जसजसा वाढत जाईल, तसे पाण्याच्या बाष्पीभवनाचे संकट उभे ठाकणार आहे. पालखेड धरण समूहात केवळ ११२८ दशलक्ष घनफूट म्हणजे ३५ टक्के पाणी शिल्लक आहे.

ग्रामीण भागांत टँकर
दारणा, भावली, मुकणे, वालदेवी, नांदुरमध्यमेश्वर, कडवा, आळंदी, भोजापूर या धरणांमध्ये एकूण ४९६१ दशलक्ष घनफूट म्हणजे २५ टक्के जलसाठा असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. गिरणा धरण तळ गाठण्याच्या मार्गावर आहे. या स्थितीवर नजर टाकल्यास उन्हाळ्यातील टंचाईची दाहकता लक्षात येऊ शकते. ऐन हिवाळ्यात ग्रामीण भागातून टँकरची मागणी सुरू झाली. जानेवारीच्या अखेपर्यंत विभागात १३६ गावे तर ६०२ वाडय़ा टंचाईग्रस्त बनल्या असून त्या ठिकाणी १६० टँकरने पाणी पुरविले जात आहे. दुर्गम भागातील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. उपलब्ध जलसाठय़ाचा नियोजनपूर्वक व काटेकोरपणे वापर झाल्यास या संकटाची तीव्रता कमी करता येईल.