वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांना गंडा

भ्रमणध्वनीवर संपर्क साधत बँक ग्राहकांना लुबाडण्याचे उद्योग दिवसागणिक वाढत आहेत. त्यात कर्ज मंजूर झाल्याचे भासवत एकाची ३२ हजार रुपयांची तर दुसऱ्या घटनेत एटीएम कार्डवरील माहिती घेऊन ४० हजार रुपयांची फसवणूक केली  आहे.

भ्रमणध्वनीवरून संपर्क साधणारे भुरटे वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असल्याचे दिसते. मुद्रा फायनान्स लिमिटेड बँकेचा व्यवस्थापक बोलत असल्याचे भासवत चोरटय़ाने एकाला याच पद्धतीने गंडा घातला. संशयिताने तक्रारदाराच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून बँकेतून तुमचे १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करत असल्याचे सांगत त्या अनुषंगाने मेल पाठविला. तक्रारदाराचे कागदपत्र ई मेलवर मागवून घेण्यात आले. नंतर कर्ज मंजूर झाल्याचा मेल पाठवत तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. या दरम्यान तक्रारदाराकडून वेळोवेळी ३२ हजार रुपये ऑनलाइन खात्यात जमा करून घेतले. अखेरीस कर्जाची रक्कम हाती न पडल्यावर हा सर्व बनाव असल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  आहे. फसवणुकीच्या दुसऱ्या घटनेत एका ग्राहकाच्या बँक खात्यातून ४०हजार रुपयांची रक्कम याच पद्धतीने दिशाभूल करून काढून घेण्यात आली. तक्रारदार अंबड औद्योगिक वसाहतीतील रिचफिल्ड कारखान्यात नोकरीस आहे.  आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम कार्डवरील १३ क्रमांकाची माहिती त्यांना विचारली. नंतर  खात्यातून परस्पर ४० हजार रुपये काढून घेतले गेले. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.