मुंबई पोलीस दलातील एका पोलीस शिपायाने रजेवर असताना नाशिक शहर पोलीस मुख्यालयाच्या वसाहतीतील त्याच्या राहत्या घरी स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राकेश बापू सोनवणे (वय ३०, रा. पोलीस मुख्यालय, लाईन नंबर ९, रूम नंबर ३५८, गंगापूर रोड, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव असून सोमवारी (दि.२४) दुपारी दरम्यान त्यांनी राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना संध्याकाळी दरम्यान त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी राकेश सोनवणे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणीनंतर मृत घोषीत केले. राकेश सोनवणे मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.