नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता आठवी, नववीची पुस्तके

येत्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता आठवी आणि नववीची संस्कृत विषयाची पुस्तके नव्या अभ्यासक्रमानुसार तयार झाली आहेत. त्यात प्रामुख्याने संवाद कौशल्यावर भर देण्यात आला आहे. सोप्या आणि सुटसुटीत आकर्षक पध्दतीची ही पुस्तके लवकरच विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या हाती पडणार आहेत.

या बाबतची माहिती बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी दिली. पुस्तकामधील बदलासाठी विशेष शिक्षण अधिकारी प्राची साठे यांनी पाठपुरावा केला. नव्या रचनेत संभाषणावर अधिक भर असणार आहे, नववीला भाषेच्या वापरावर आधारीत प्रश्न असलेल्या कृतीपत्रिकेची तयारी आठवीपासून करण्यात येणार आहे. सातवी आणि नवव्या इयत्तेची सर्वच विषयाची पुस्तके बदलणार आहे. तसेच आठवीचे संस्कृत पुस्तक बदलणार आहे. आजवर मराठीसह हिंदी, कन्नड, तेलगु, सिंधी, इंग्रजी उर्दू, गुजराथी या आठ भाषांमध्ये अर्थ सांगत त्या त्या भाषेतून सूचना देत संस्कृत विषय शिकवला जात होता. प्रश्नपत्रिकेत मराठी किंवा इतर सात भाषांमधून सूचना व प्रश्न असत. आता प्रश्न आणि सूचना केवळ संस्कृतमधून असणार आहे. नव्या पुस्तक रचनेत सूचना, शब्दार्थ यांचे अर्थही सोप्या संस्कृत भाषेतून देण्यात आले आहेत. पूर्वी व्याकरण आणि भाषा रचनेला अधिक महत्व होते. आता विद्यार्थ्यांना संस्कृतमधून संभाषण करता यावे अशा प्रकारे या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. स्वयं अध्ययन, कृतीयुक्त मूल्यमापन, ज्ञानरचनावाद अशा आधुनिक संकल्पना या पाठय़पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्यक्षात येत आहे. विद्यार्थ्यांना भाषेचा वापर करता येतो की नाही, हे यातून पाहिले जाईल. उतारावाचन, ई मेल लेखन, शब्दकोडे असे प्रश्नही त्यात असतील. यासाठी संस्कृत समिती प्रमुख पं. गुलाम दस्तगीर बिराजदार, तरंगिणी खोत, डॉ. प्रज्ञा देशपांडे, प्रसादशास्त्री कुलकर्णी, शेवंती दांगट आदींनी काम केले.

पुस्तकाचे वैशिष्ठय़े

संस्कृत भाषेची पुस्तके पूर्णत संस्कृतमध्ये तयार करण्यात आली आहेत. काही शब्दांचे वा श्लोकांचे अर्थ समजण्यात मदत व्हावी, याकरीता ‘क्युआर कोड’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याद्वारे एखादा पाठय़पुस्तकातील भाग चित्रफित किंवा ध्वनीमुद्रित करून तो भ्रमणध्वनीवर विद्यार्थी व पालकांना ऐकता किंवा पाहता येईल.

भाषिक कौशल्ये वाढविण्यास मदत

विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित करण्यासाठी संभाषण पध्दतीने संस्कृतचे पाठय़पुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठय़पुस्तकातील गीते, कथा, संवाद आणि स्वाध्याय यातून भाषा शिकण्याचा आनंद मिळेल. संपूर्ण व संयुक्त पाठय़क्रमांमध्ये अध्ययन पध्दतीची समानता आहे.

डॉ. प्रसादशास्त्री कुलकर्णी (संस्कृत समिती सदस्य, बालभारती)