जगभरात वेगवेगळ्या कारणांनी होणारा जलप्रकोप.. सद्यस्थितीत राज्यात असणारी पूरस्थिती. एखाद्या शहरात अचानक होणारी तापमानवाढ.. पर्यावरणातील बदलांबाबतचे कुतूहल शमविण्याची अनोखी संधी नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात दाखल झालेल्या ‘सायन्स एक्स्प्रेस’ने उपलब्ध केली आहे. सोमवारी रेल्वे स्थानक परिसरातदाखल झालेल्या या विज्ञान प्रदर्शनाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ज्ञान आणि मनोरंजनाचा अभूतपूर्व खजिना अनुभण्यास शहरवासीयांनी सुरुवात केली आहे.

नाशिकरोड स्थानकावरील फलाट क्रमांक चारवर या विज्ञान प्रदर्शनाचे आगमन झाले. चालते फिरते विज्ञान प्रदर्शन नाशिक सह राज्य तसेच देशातील ६८ रेल्वे स्थानकात भ्रमंती करणार आहे. यंदा एक्स्प्रेसने वातावरणातील बदल या संकल्पनेकडे लक्ष वेधले. तेरा डब्यांच्या आधुनिक रेल्वेत उपरोक्त संकल्पनेशी संबंधित विविध पैलु स्पष्ट व्हावे यासाठी तक्ते, वेगवेगळ्या प्रतिकृती, मार्गदर्शन यावर भर देण्यात आला. वेगळ्या धाटणीच्या विज्ञान प्रदर्शनात मानवामुळे जलवायू परिवर्तन होऊन पृथ्वी कशी संकटात येईल याकडे लक्ष वेधतांना भारताने जलवायूबाबत का काळजी करावी, या बदलामुळे माणसांचे आरोग्य कसे धोक्यात आले आहे, जागतिक तापमान वाढ कशी होते यावर प्रकाश टाकण्यात आला. प्रदूषण टाळण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात उपलब्ध पर्याय या प्रदर्शनात समजतात. बदलत्या जीवनशैलीने पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो, जीवनशैली बदलात वापरलेले नैसर्गिक स्त्रोत आदींची माहिती देण्यात आली आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी काय करता येईल, यासाठी देशाने कोणते धोरण अवलंबावे, त्यासाठी निधी कसा लागेल याची सखोल माहिती देण्यात आली आहे. जागतिक तापमान वाढ थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या पुढाकाराने सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.

त्यात छोटय़ा छोटय़ा युक्तींचा अवलंब केल्यास परिस्थिती कशी बदलू शकते याबाबत काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्ञानाचा खजिना विद्यार्थ्यांना कितपत समजला हे जाणून घेण्याकरिता खेळ आणि मनोरंजनावर आधारीत विज्ञान व गणित विषयाचे वेगवेगळे खेळ आहेत. मुलांना विज्ञानाची जादू तसेच वैज्ञानिक प्रयोग शिकवले जात आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक खेळ, प्रश्नोत्तरांची स्पर्धा घेतली जाते. २६ जुलैपर्यंत या प्रदर्शनाचा विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

समस्यांवर पर्यायही उपलब्ध

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने पारंपरिक जीवनशैलीचा वापर करीत आपल्या सभोवतालच्या समस्या, त्यावर पर्याय कसा शोधता येईल याची माहिती प्रदर्शनात दिली आहे. यामध्ये शॉकप्सर, एनर्जी इफिशिएन्ट स्टोव्ह, नैसर्गिक डायपासून केलेली खेळणी, हातपंप, मल्ट्री ट्री क्लायम्बर, शुगरकेन बड चिपर आदी उपक्रम पाहता येतात.