नाशिकचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका मातेच्या यात्रोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात होत असून पोलीस व ट्रस्टने सुरक्षिततेच्यादृष्टीने जय्यत तयारी केली आहे. मंदिर परिसरात कायमस्वरुपी २४ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून जवळपास २०० हून अधिक सुरक्षारक्षक व स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. रांगेत उभे राहू न शकणाऱ्या भाविकांसाठी ट्रस्टने मुखदर्शनाची स्वतंत्र रांग करत खास व्यवस्था केली आहे. यात्रेच्या पाश्र्वभूमीवर, जुना आग्रा रस्त्यावरील वाहतूक सकाळी पाच ते दहा आणि दुपारी चार ते रात्री बारा या कालावधीत दररोज बंद ठेवण्यात येणार आहे.

यात्रोत्सवात दररोज साधारणत: दीड लाख भाविक कालिका मातेच्या दर्शनासाठी येतात, असा ट्रस्टचा अनुभव आहे. दर्शनासाठी महिला व पुरूषांच्या स्वतंत्र रांगा आहेत. यंदाचे वैशिष्ठय़ म्हणजे, ट्रस्टने मुख दर्शनासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था केली असल्याचे ट्रस्टचे विश्वस्त अण्णा पाटील यांनी सांगितले. यात्रोत्सवाच्या काळात जुन्या आग्रा रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
मोडक चौक सिग्नल ते संदीप हॉटेल, संदीप हॉटेल ते मोडक चौक सिग्नल, पालिका आयुक्त निवासस्थान ते भूजल सर्वेक्षण कार्यालय, चांडक सर्कल ते संदीप हॉटेल, महामार्ग बसस्थानक ते संदीप हॉटेल या दरम्यानच्या रस्त्यांवर यात्रोत्सव काळात पहाटे पाच ते सकाळी दहा तसेच सायंकाळी चार ते रात्री बारा या कालावधीत प्रत्येक दिवशी वाहतूक बंद राहणार आहे.

१३ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत उपरोक्त मार्गावरील हलकी वाहने महामार्ग बसस्थानक, टॅक्सी थांबा, तुपसाखरे लॉन्स मार्गे चांडक सर्कल मार्गे शहरात येतील. मोडक चौक सिग्नलवरून जाणारी वाहने साठ फुटी रस्त्याने द्वारका सर्कल या मार्गाने नाशिकरोड व सिडकोकडे जातील. नाशिक शहरातून अंबड, सातपूर परिसरात जाणारी जड वाहने ही द्वारका सर्कलवरून गरवारे टी पॉइंट या मार्गाने सातपूर औद्योगिक वसाहतीत जातील. सारडा सर्कल कडून गडकरी चौकाकडे येणारी वाहने ही एन. डी. पटेल रोडने किटकॅट चौफुली, मोडक सिग्नल मार्गे जातील.

भगूर येथेही बदल

भगूर येथे रेणुका देवी मंदिराच्या यात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १३ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी पाच ते अकरा तसेच सायंकाळी चार ते रात्री १२ या कालावधीत रेस्ट कॅम्परोड जोशी हॉस्पीटल ते जोजीला मार्ग, केंद्रीय विद्यालयापर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.