रस्ता कामाचे देयक मंजुरीसाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना पकडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन अभियंत्यांची न्यायालयाने १७ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयितांकडील बेहिशेबी मालमत्ता शोधण्यास सुरूवात केली आहे. त्यात कार्यकारी अभियंता देवेंद्र पवारच्या घरात सहा लाखाचे सोने व पावणे दोन लाखाची रोकड आढळून आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

काही वर्षांपूर्वी लाच घेताना पकडलेल्या सतीश चिखलीकरकडे सापडलेल्या कोटय़वधींच्या मालमत्तेवरून सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या श्रीमंतीवर प्रकाश पडला होता. त्या कारवाईनंतर सार्वजनिक बांधकाममधील तीन बडे अधिकारी एकाचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. रस्ता कामाचे देयक मंजूर करण्यासाठी तीन लाख रुपये स्वीकारताना येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार (३५), सहाय्यक अभियंता सचिन पाटील (४२) आणि शाखा अभियंता अजय देशपांडे (४५) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. संशयितांमधील पवार हा नाशिकच्या महापौरांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. शनिवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाममधील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह भाजपचे काही पदाधिकारी न्यायालयाच्या आवारात जमले होते. सरकारी पक्षाने संशयितांच्या बेहिशेबी मालमत्तेची तपासणी तसेच या प्रकरणात अन्य अधिकाऱ्यांचा सहभाग आहे काय, याची छाननी करावयाची असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.

दोन्ही बाजुकडील युक्तीवाद ऐकून न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडी सुनावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी संशयितांकडील बेहिशेबी मालमत्तेचा शोध सुरू केला आहे. त्या अंतर्गत पवारच्या शासकीय निवासस्थानाची छाननी करण्यात आली. त्यात सहा लाखाचे सोने व पावणे दोन लाखाची रोकड सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. उर्वरित दोन संशयितांची मालमत्ता शोधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्या अंतर्गत बँकेतील लॉकरही उघडण्यात आल्याचे समजते.