अनेक गावांना टँकरची प्रतीक्षा

धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीचा ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील ग्रामस्थ पाण्यासाठी व्याकूळ झाला आहे. तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव, आंबेवाडी, चिंचलेखैरे, खडकेद या गावांना तत्काळ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासह मुकणे धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील गावांनी केली आहे. महिनाभरात अजून काही गावांमध्ये टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे.

तालुक्यात डोंगराळ भाग असल्याने आटलेले पाण्याचे स्त्रोत, कमकुवत योजना, लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, वीज मंडळाची अनास्था यामुळे अनेक योजना बंद पडत असल्याने टंचाईची झळ बसत आहे. तालुक्याजवळच त्रंबकेश्वर तालुक्यातील बेरवळ, धाडोशी ,सामुंडी, गणेशगाव, विनायकनगर, कौलपेंढा, उंबरदरी या गावांना तसेच वाडय़ा-पाडय़ांना टंचाई जाणवत असतानाही अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दुर्लक्षाविषयीची तक्रार देऊनही दखल घेतली जात नाही. टंचाईचा निकष ठरवतांना असलेली नियमावली अनेक वाडय़ा, पाडय़ांसाठी जाचक ठरत आहे. तालुक्यातील दारणा नदीलगत आणि लहान-मोठय़ा धरणांलगत असणाऱ्या अनेक गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची स्थिती आहे. महिलांना पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत गावापासून दूरवर अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी आणावे लागते. गत वर्षांच्या तुलनेत यंदा सरासरी चांगला पाऊस होऊनही तालुक्यापुढे टंचाईचे संकट उभे राहिले आहे.

पावसाचे माहेरघर म्हटला जाणारा इगतपुरी तालुका डोंगराळ व खडकाळ भागाचा असल्याने ग्रामीण भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. शिरसाठे, मोडाळे, सांजेगाव, टाकेद, खेड परिसरातील अनेक गांवानी टँकरद्वारे पाणी पुरवठय़ाची मागणी केली आहे. वैतरणा परिसरातही अनेक गावांमध्ये कृत्रिम टंचाई जाणवत आहे. चिंचलखैरे, खेड भागातील अनेक गावांत हीच स्थिती आहे. तालक्यात जीवन प्राधिकरण, राष्ट्रीय पेयजल, भारत निर्माण, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, आदिवासी उपाययोजनेच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. परंतु, या योजना कुचकामी ठरल्या आहेत. टाकेद भागातील ठोकळवाडी आणि धानोशी गावाने महिन्यापूर्वी टंचाईविषयक प्रस्ताव पाठवूनही इगतपुरी, त्र्यंबकेश्वरच्या प्रांताधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे पंचायत समितीतून सांगण्यात आले.

आदिवासी वस्त्या, वाडय़ांची लोकसंख्या कमी असल्यामुळे प्रस्ताव देऊनही योजना मंजूर होण्यास तांत्रिक अडचण येते. या कारणांनी तो प्रस्ताव नामंजूर होतात. परिणामी समस्या कायम राहते. शासनाने दखल घेऊन खास बाब म्हणून ही समस्या सोडविण्याची मागणी खेडचे जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी केली आहे. तहसीलदार अनिल पुरे यांनी पंचायत समितीकडून दोन ठिकाणचे टंचाईग्रस्तविषयक प्रस्ताव आमच्याकडे आले असून त्यावर कार्यवाही करून प्रांताधिकारी कार्यालयात पुढील आदेशासाठी पाठविण्यात आल्याची माहिती दिली. उपसभापती भगवान आडोळे यांनी ग्रामपंचायती आणि सामान्य नागरिकांनी थेट आमच्याकडे या विषयावर तRाारी अथवा सूचना केल्यास समस्या सोडविणे सोपे होईल, असे नमूद केले. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांना टंचाई जाणवत असतानाही अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आलेला नसल्याचे श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी निदर्शनास आणून दिले. संबंधित गावांना तत्काळ पाणीपुरवरठा न केल्यास तहसील व प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.

तालुक्यातील पाडळी, जानोरी, अस्वली, बेलगावकुऱ्हे, नांदुरवैद्य या परिसरातही पाण्याची स्थिती भीषण झाली आहे. पाणी आटल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाल्याने प्रशासनाने विनाविलंब मुकणे धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातून होत आहे.

जमिनीची चाळण

पाण्याअभावी खरीप व रब्बी पिके गेली आहेत. जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. काही शेतकऱ्यांनी ३०० फूट खोल कूपनलिका खोदूनही पाणी लागलेले नाही. तरीही शेतकऱ्यांकडून जमिनीची चाळण सुरूच आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. एकाच शेताता तीन, तीन ठिकाणी कूपनलिका खोदूनही पाणी लागत नाही. २५० ते ३०० फुटापर्यंत खोदकाम करावे लागत आहे. हजारो रुपये खर्च करूनही खोदलेल्या कूपनलिकेस पाणी लागत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे रहात आहे. कूपनलिका खोदण्यास शेतकऱ्यांना १५ ते १६ हजार रुपये खर्च येत आहे.

इगतपुरीजवळील डोंगरदरीत वसलेल्या चिंचले हद्दीतील खैरेपाडा येथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याने येथील नागरिकांना डोंगरदरीतील एका झिऱ्यातून पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. हंडाभर पाण्यासाठी तब्बल दीड ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. मिळालेले पाणी शुद्ध असेलच याची खात्री नाही. खैरेपाडा येथील ग्रामस्थांना किमान टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसीलदारांची भेट घेतली.