चायनीजला आव्हान देत एलईडी पणत्या, दीपमाळ बाजारात

लोणचे, पापड, शिवणकाम यांसारख्या पारंपरिक कामांच्या चक्रातून महिला बचत गटांनी बाहेर पडण्याचे आवाहन कायम करण्यात येत असताना पर्यायाच्या शोधात असणाऱ्या बचत गटांनी आता एलईडी पणत्या आणि दीपमाळ बाजारात आणली आहे. एकीकडे चायनीज वस्तुंवर बहिष्कार टाकत स्वदेशी वस्तू वापरण्याचा आग्रह होत असल्याने दीनदयाळ महिला बचत गटाने संपूर्णपणे स्वदेशी आणि त्यातही नाशिकमय अशा वस्तू बाजारात आणल्याने बचत गटांच्या विक्री व व्यवसाय क्षेत्रात हे ‘पुढचं पाऊल’ ठरण्याची शक्यता आहे.

सध्या सर्वत्र स्वदेशीचा मंत्र जपतानाच चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन समाज माध्यमांमधून केले जात आहे. चायनीज वस्तूंचे बाह्यरंग आकर्षक असले तरी अंतरंग मानवी जीवन आणि पर्यावरणासाठी तितकेच घातक असल्याचे सिध्द झाले आहे. परंतु, बहुतांश चायनीज वस्तूंना पर्याय उपलब्ध नसल्याने नाइलाजाने त्या वस्तू घ्यावे लागत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. भारतीय बनावटीच्या बहुतांश उत्पादनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचतच नाही. विज्ञान भारती संस्थेचे कार्यकर्ते अमित कुलकर्णी यांनी यासंदर्भात संशोधन करून हानिकारक पदार्थापासून हितकारक अशा दर्जेदार आणि टिकाऊ एलईडी पणत्या आणि दीपमाळ नाशिकच्या सातपूर येथील दीनदयाळ महिला बचत गटामार्फत बाजारात पोहचविण्याचा ध्यास घेतला. बचत गटाने उत्पादित केलेल्या एलईडी पणत्या आणि ‘कुलदीप’ या दीपमाळेने अशा प्रकारे चायनीज वस्तूंना पर्याय उपलब्ध करून दिला आहे. अस्सल स्वदेशी असलेल्या या पणत्या पर्यावरणपूरक तर आहेतच, शिवाय अनेक फायदे देणाऱ्याही आहेत. लोकांनी निरुपयोगी म्हणून टाकून दिलेल्या सफेद प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्यापासून या पणत्या तयार करण्यात आल्या असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. दिवाळीत सर्वच जण अंगणात पणत्या लावतात. या पणत्यांसाठी लागणाऱ्या तेलामुळे बसणारा आर्थिक फटका फटाक्यांच्या आवाजाप्रमाणेच मोठा असतो. एलईडी पणत्यांमुळे तेलाची बचत होण्यास मदत होते. पारंपरिक पणत्यांमुळे होणाऱ्या अपघातांनाही यामुळे पायबंद बसून सुरक्षिततेत वाढ होणार आहे. या पणत्या लहान घडय़ाळातील सेलवर चालतात. एकदा लावलेले सेल पणती सतत सुरू ठेवली तरी तीन दिवस हमखास चालतात. ग्राहकांच्या पसंतीनुसार निळा, हिरवा, लाल या रंगात पणत्यांचे दिवे तयार करण्यात आले आहेत. १६ फुटांच्या दीपमाळेत ११ दिव्यांची जोडणी करण्यात आली आहे.

नाशिकच्या महिला बचत गटाच्या या उत्पादनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रशंसा केली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यामार्फत ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ही उत्पादने पंतप्रधानांच्या ‘७, लोककल्याण मार्ग’ या निवासस्थानी लावण्यासाठी दीनदयाळ बचत गटाच्या संस्थापक जयश्री कुलकर्णी यांनी दिली होती.

चायनीज दीपमाळ आणि दीनदयाळ बचत गटाच्या कुलदीप या दीपमाळेतील फरकच त्यांचा दर्जा सिद्ध करतो. चायनीज उत्पादने वापरताना त्यातील धोक्यापासून ग्राहक अनभिज्ञ असतात. केवळ कमी किमतीत मिळतात म्हणून त्यांना प्राधान्य दिले जाते. चायनीज दीपमाळ अत्यंत कमकूवत आणि असुरक्षित असून त्या दीपमाळेची कोणतीही हमी कोणताच दुकानदार देत नाही. दुकानात सुरू असलेली दीपमाळ घरी आणताच बंद पडल्याने ती फेकून देण्याशिवाय गत्यंतर राहात नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. तकलादू वायर आणि गरम होणाऱ्या फिलॅमेंट बल्बचा वापर या दीपमाळेत केलेला असतो. चायनीज दीपमाळेसाठी २२ व्ॉट वीज वापरली जाते. एकजरी दिवा बंद पडला तरी संपूर्ण माळ बंद पडते. तुलनेत ११ पणत्यांच्या कुलदीप माळेत सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले असून विजेच्या धक्क्याचा कोणताही धोका नाही. एखादा दिवा बंद पडला तरी सर्व माळ सुरू रहाते. वीजही अत्यंत कमी लागते. महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने महिलांच्या माध्यमातूनच या एलईडी पणत्या आणि दीपमाळेची विक्री व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती अमित कुलकर्णी यांनी दिली. या पणत्यांच्या उत्पादनामुळे सुमारे ३५ महिलांना रोजगार मिळाला आहे. अमेरिकेतही पणत्या व दीपमाळा पाठविण्यात आल्या असून लवकरच दुबई येथेही त्या पाठविण्यात येणार आहेत. या व्यवसायासाठी राष्ट्रीयीकृत बँका पंतप्रधान मुद्रा लोन योजनेतून कर्जही देत असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.