मुख्य विद्युतवाहिनीवर झाड कोसळले; दोन घरांचे नुकसान

संपूर्ण उरण तालुक्याला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य विद्युतवाहिनीवर वायुविद्युत केंद्राच्या वीज निर्मिती प्रकल्पाच्या कामगार वसाहतीतील मोठे झाड कोसळल्याने गुरुवारी रात्री अकरापासून उरण तालुक्यातील वीज खंडित झाली आहे. या झाडामुळे वसाहतीच्या कुंपणाला लागून असलेल्या दोन घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने या घरातील आठ जण बचावले आहेत. तर वीज वितरण कंपनीकडून झाड काढण्याचे काम सुरू आहे. या परिसरात मान्सूनपूर्व झाडांची छाटणी न झाल्याने पहिल्याच पावसाच्या जोरदार दणक्याने ही घटना घडली आहे.

वीज निर्मिती करून राज्याला वीज देणाऱ्या उरण तालुक्यातच वीज खंडित होण्याच्या घटनात वाढ झाली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी, नागरिक व व्यवसायिकही त्रस्त झाले आहेत. गुरुवारी रात्री जोराच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे महाजनकोच्या वायुशक्तीनगर कामगार वसाहतीतील ३५ ते ४० वर्षांचे झाड मुळापासून उखडले. हे झाड इतके मोठे होते की त्यामुळे वसाहतीतील इमारतीजवळील संपूर्ण भाग उखडला आहे. हे अजस्र झाड दगडाचे कुंपण तोडून कुंपणालगत असलेल्या दोन खोल्यांच्या घरावर कोसळले. त्यामुळे या दोन्ही खोल्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेनंतर प्रसंगावधान राखल्याने येथे राहणाऱ्या आठ जणांचा जीव वाचला. तर दुसरीकडे हे झाड महावितरण कंपनीकडून करण्यात येणाऱ्या वीजपुरवठय़ातील प्रमुख विद्युतवाहिन्यांवर पडल्याने संपूर्ण तालुक्याचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर सकाळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लाकूड तोडणाऱ्यांच्या मदतीने हे झाड हटविण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी.एस.साळी यांनी दिली. तर यामुळे वीज निर्मिती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मागील बारा तासांपासून अंधारातच काढावे लागले. त्यामुळे या विद्युतवाहिन्या भूमिगत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.