पनवेल येथील सर्वच विद्यालयांच्या व्यवस्थापनांनी विकास निधी, इमारत निधी व प्रवेश शुल्कांच्या नावावर पालकांकडून पैसे उकळण्याचे राजरोस कार्यक्रम सुरू ठेवला असून विद्यालयांच्या या मनमानीला चाप लावण्यासाठी प्रहार विद्यार्थी संघटनेने अशा विद्यालयांच्या व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिक्षण विभागातील पनवेल गटशिक्षणाधिरी नवनाथ साबळे यांच्याकडे केली आहे. रायगड जिल्ह्य़ातील एकूण विद्यालयांपैकी ७० विद्यालये पनवेलमध्ये आहेत. खासगी व नामवंत विद्यालयांसोबत काही बडय़ा राजकीय पक्षांच्या मालकीची ही विद्यालये असल्याने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था देणगी प्रतिबंधक कायद्याप्रमाणे अतिरिक्त देणगी घेण्यास मनाई आहे. तरीही पालकांकडून विद्यालयाने जाहिरात केलेल्या कागदपत्रांवर विकास निधी, इमारत निधी व प्रवेश शुल्क हजारोंनी घेतले जाते.
पनवेलमधील अनेक खासगी विद्यालये ही राजकीय पक्षांच्या बडय़ा नेत्यांच्या मालकीची असल्याने शिक्षण विभागातील अधिकारी या विद्यालयांमधील कारभाराच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष करतात. काही खासगी शिक्षण संस्थेमध्ये पालकांना ऐपत नसल्यास पाल्यांना जिल्हा परिषदेच्या विद्यालयात प्रवेश घेण्याच्या सूचना देतात.
त्यामुळे पनवेलच्या शैक्षणिक संस्थांमध्ये होणाऱ्या सामाजिक भ्रष्टाचाराविरोधात प्रहार विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्राचे संघटक संतोष गवस यांनी विद्यालय व्यवस्थापनाविरोधात पालकांची चळवळ उभी केली आहे.
नेमकी काय कारवाई झाली याची प्रत शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. विद्यार्थी संघटनेच्या या चळवळीत सामान्य पालकांनी सहभाग घ्यावा यासाठी गवस यांनी ७७३८०८९६६६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.