कार्यभार स्वीकारताच नवनियुक्त आयुक्तांची प्रशासनावर पकड
लोकाभिमुख कारभार करण्यासाठी सोडवणूक करता येईल अशा मूळ प्रश्नांना बगल देऊ नका; असे प्रश्न सोडविता येत नसतील तर सबबी ऐकून घेणार नाही, अशा शब्दांत नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिका मुख्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दम भरला.
पालिकेचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पालिकेच्या कामकाजातील पहिला दिवस हा शिस्तीचा राहील, यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी कमालीचे सावध होते. गेले काही दिवस कामकाजात आलेली मरगळ मुंढे यांच्या प्रवेशाने झटकली गेली. त्यांनी पहिल्यांदा अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यांनी पालिकेतील प्रत्येक दालनाला भेट दिली. कर्मचाऱ्यांची कामाची पद्धती तपासली.
कामकाजात चूक खपवून घेतली जाणार नाही. कामाच्या पद्धतीतील चुकीच्या बाबी तत्काळ काढून टाकल्या जातील. त्यासाठी अधिकाऱ्यांनी आग्रही असणे गरजेचे आहे, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली.
पालिकेचा लेखा विभाग महत्त्वाची कामगिरी बजावत असतो. मुंढे यांनी या वेळी या विभागातील सर्व कक्षात जाऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
पालिकेच्या नियमावली कठोर पद्धतीनेच राबवली गेली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. या वेळी त्यांनी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची परीक्षाच घेतली. कोणत्या नियमात काय बसते, असे प्रश्न विचारून त्यांनी अधिकाऱ्यांची कोंडी केली. पालिकेच्या मालमत्ता विभागाची पाहणी करताना त्यांनी प्रशासन वसुलीच्या आघाडीवर कमी का पडत आहे, याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला. त्यानंतर त्यांनी त्याचा लेखाजोखा मागवला. केवळ कारणे दाखवा, असा कारभार खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे सर्व अधिकारी व कर्मचारी शिस्त सांभाळत विनम्र वागणूक देत असल्याचे पाहून मुख्यालयात आलेल्या नागरिकांना काहीसा आश्चर्याचा धक्का बसला.
* आयुक्त सकाळी दहा वाजता मुख्यालयात येणार असल्याने सर्व विभागातील कर्मचारी वेळेआधी कार्यालयात.
* साफसफाईकडे विशेष लक्ष.