भंगारात आलेली स्फोटके दहा वर्षांपासून पडून
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी उरण बंदराला भेट देणार असून या कार्यक्रमस्थळापासून २० मिनिटांच्या अंतरावर जिवंत स्फोटकांचे गोदाम असल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. ही स्फोटके नष्ट करण्यासाठी सुमारे सहा लाखांचा खर्च अपेक्षित असताना तेथे पहारा देणाऱ्या पोलिसांच्या वेतनावर आतापर्यंत चाळीस लाख रुपये खर्च झाले आहेत. या स्फोटकांची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्रीय गृहविभाग व राज्याच्या गृहविभागाने आजवर पावले उचललेली नाहीत. विविध सरकारी खात्यांत समन्वय नसल्याने ही स्फोटके दहा वर्षांपासून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मोसारा येथील गोदामात पडून आहेत.
२००४ च्या ऑक्टोबरमध्ये इराक येथून उरण येथील जेएनपीटी बंदरामध्ये २५ कंटेनर आले होते. त्यापैकी १३ कंटेनरमध्ये स्फोटके होती. भंगाराच्या नावावर युद्धात वापरलेली ही स्फोटके भारतात आणण्यात आली. त्यापैकी १३ कंटेनर उत्तर प्रदेशात पाठविण्यात आले तर एक कंटेनर कळंबोलीमधील लोखंड बाजारातील मनोजकुमार सोहनलाल शर्मा यांच्या गोदाम क्रमांक ५९९ मध्ये पाठविण्यात आला. त्यामध्ये कळंबोली पोलिसांना एक टन जिवंत व भंगारातील स्फोटके सापडली.
रॉकेट, हॅण्डग्रेनेड, बॉम्ब, गन बुलेट, रॉकेटचे लोखंडी पार्ट, बुलेटहेड, सिलेंडर असे ९४१ नग या भंगारवाल्याच्या गोदामात सापडले. पोलिसांनी याप्रकरणी मनोजकुमार शर्मासोबत अँथनी स्वामी, मोहम्मद इक्बाल कादरी, दीपक अग्रवाल यांना अटक केली. ही स्फोटके दोन वर्षे कळंबोली पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आली होती. परंतु एनएसजीच्या पथकाने ही स्फोटके नष्ट होईपर्यंत लोकवस्तीपासून दूर ठेवण्याची सूचना केल्यानंतर ही स्फोटके पनवेल उरणच्या वेशीवरील गोदामात ठेवण्यात आली. स्फोटके नष्ट करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी अनेक प्रयत्न केले, मात्र या प्रयत्नांना सरकारी लालफितीच्या कारभाराचा फटका सहन करावा लागला. दहा वर्षांपासून नवी मुंबई पोलीस ही स्फोटके नष्ट करण्यासाठी न्यायालय, स्फोटक नियंत्रण विभाग, महाराष्ट्र राज्याचे गृहविभागाकडे पाठपुरावा करत आहेत. अनेक विभागांना स्मरणपत्रे देऊनही हा प्रश्न सुटलेला नाही. ही स्फोटके नष्ट करण्यासाठी सहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निव्वळ सहा लाख रुपये खर्च करण्याची तरतूद पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीत नसल्याचे या प्रकरणी समोर आले आहे. ही स्फोटके इराक युद्धातील असल्याने भारताकडे युद्धातील स्फोटके नष्ट करण्यासाठी तज्ज्ञांची यंत्रणा नसल्याने ही वेळ आली असल्याचे पोलीस विभागात बोलले जात आहे. स्फोटक विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे या स्फोटकांची विल्हेवाट लावण्याचे आदेश पनवेलच्या न्यायालयाने दिले आहे. तरीही ही स्फोटके नष्ट करण्यात आलेली नाही. याबाबत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रयत्न केला असता ते सिडकोच्या बैठकीत असल्याने संपर्क होऊ शकला नाही.