राजीव गांधी उद्यान, ऐरोली सेक्टर ३

हास्य क्लबमध्ये गेल्याशिवाय हसायला कारण मिळत नाही, अशी आजची अवस्था आहेच, हे मान्य करायला हवं; पण काही मंडळी खूप चिकाटी बाळगून रोज सकाळी बळेबळे का होईना, हटकून हसायला येतात. ऐरोली सेक्टर- ३ मधील राजीव गांधी उद्यानात या हसणाऱ्या मंडळीची तशी काही तक्रार नाही. रोज हसणं आणि त्यासोबत जमेल तसा व्यायाम करण्याचा प्रयत्न ते करीत असतात. खरं तर राजीव गांधी उद्यान आहेच ते ‘महावितरण’च्या उच्च दाबाच्या वाहिनीखाली. त्यामुळे इथे येऊन उच्च रक्तदाब आणि मधुमेह या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी येणाऱ्यांना काही गैरसोयीसाठी ‘टेन्शन’ आल्याची प्रतिक्रिया काही जणांनी दिली. पालिकेच्या या उद्यानात काही प्रमाणात डागडुजी करण्यात आली आहे, पण ती पुरेशी नसल्याची तक्रार इथे येणारे नागरिक नेहमी करतात. या भागातील साईनाथ वाडी, समता नगर, ऐरोली गाव, साईनाथ वाडी आणि इतर सेक्टरमधून नागरिक येथे मोठय़ा संख्येने येतात. काहींना बच्चे कंपनीची सोबत असते. प्रशस्त जागा, चौरसाकृती जॉगिंग ट्रॅक ही या उद्यानाची वैशिष्टय़े मध्यवर्ती ठिकाण असल्याने गर्दीलाही कधी तोटा नसतो.

या उद्यानात ७०० मीटरचा जॉगिंग ट्रॅक आहे; पण त्याची रुंदी कमी असल्याने एका वेळी दोनच जणांना ट्रॅकवरून चालता येते. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सात वर्षांपूर्वी तिघांनी मिळून ‘लाफ्टर कल्ब’ तयार केला. आजघडीला ७० हून अधिक जण या क्लबमध्ये आहे. या क्लबचे प्रमुख सोपान बामणे यांचे यात अनेकांना सामावून अद्यापही प्रयत्नशील आहेत. क्लबमधील ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. दोन ते तीन तासांच्या व्यायामानंतर सर्वाना गरम चहा देण्यात येतो. क्लबमधील सदस्यांसाठी दोन महिन्यांतून एकदा देवस्थानाला फिरवून आणण्यात येते. आजवर आंळदी, पंढरपूर आणि तिरुअनंतपूरम अशा ठिकाणी सदस्यांची फिरस्ती झाली आहे.

क्लबमधील सदस्यांना वेळप्रसंगी आर्थिक मदतही केली जाते. तो सर्व खर्च इतर जण मिळून करतात. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवसही साजरे केले जातात. उद्यानात सहा वर्षांपासून पतंजली योग केंद्राच्या वतीने मोफत योग वर्ग चालवले जातात. ‘मानवता एकता संघ’ यासाठी गेली चार वर्षे प्रयत्नशील आहे. १०० ते १२५ जणांचा एक गट यात आहे. संघातील सदस्य उद्यानातील स्वच्छता मोहिमेतही सहभागी होतात.

ऐरोली सेक्टर ३ हून सेक्टर- २० कडे जाण्यासाठी सध्या रस्ता नाही. त्यामुळे गावदेवी मैदानाकडून वळसा घालून जावे लागते. त्यासाठी राजीव गांधी उद्यानातून शॉर्टकट काढण्यात आला आहे. त्यामुळे दिवसभर ये-जा करणारे असतात.

उद्यानात येणाऱ्यांना काही गोष्टींचा त्रास होतो. म्हणजे काही विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे काही वेळेला आरडाओरड करीत असतात. काही वेळेला गोंधळ माजवतात, तर रात्री मद्यपींचा अड्डा येथे जमलेला असतो. सुरक्षा रक्षकांनी काही प्रेमीयुगुलांना वा मद्यपींना हटकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यासमोर अरेरावी केली जाते. सार्वजनिक शौचालयाची दैना झालेली आहे. रोज सफाई नसल्याने महिलांना त्रास सहन करावा लागतो.

पालिकेने सुसज्ज असे उद्यान साकारले आहे; पण येथे साफसफाई नसते. पावसाळ्यात तर खूपच त्रास होतो, तसेच शौचालयाची साफसफाई करण्यात येत नसल्यामुळे दरुगधीचा त्रास होतो. आत काही जण मद्यपानदेखील करतात. त्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्तीत वाढ करणे आवश्यक आहे.

रमेश हांडे , नागरिक