‘‘वडिलांची मुलाकडून काय अपेक्षा असते कुणास ठाऊक! झाडं जशी आपल्या बिया वाऱ्याबरोबर सोडून देतात आणि सांगतात की, जा, नव्या भूमीच्या नव्या प्रदेशाच्या शोधात जा. तिथल्या पांथस्थांना माझ्यासारखीच सावली दे. फुलांची पखरण कर. तिथं जाऊन तू माझ्या मनातलं गाणं फुलव. तसं माणसं का करीत नाहीत?’’ – हरिलाल (अंक पहिला)
‘गांधी विरुद्ध गांधी’चा विषय माझ्यापर्यंत येण्यापूर्वी गांधींच्या जीवनाचा आणि कार्याचा बराचसा परिचय झाला होता. माझे वडील पत्रकार म. य. दळवी लोहियावादी. आई गांधींना मानणारी. त्यामुळे अनेक गोष्टी कानावर पडत गेल्या. पुढे राज्यशास्त्राचा आधी विद्यार्थी आणि नंतर प्राध्यापक झाल्यामुळे तसंच ‘युवक क्रांती दला’मुळे वाचन होत गेलं. गांधींचं व्यामिश्र, गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व समजून घेण्याची उत्सुकता अनेकदा वाटली. पण त्यांच्यावर कधी नाटक लिहीन असं वाटलं नव्हतं. त्यांचा मोठा मुलगा हरिलाल मद्यपान करीत असे, त्यानं धर्मातरही केलं होतं, हे वाचनात आलं होतं. पण अनेक मोठय़ा माणसांची मुलं बिघडलेली असतात यापलीकडे याचा विचार केला नव्हता. दिनकर जोशीलिखित आणि स्मिता भागवत अनुवादित ‘प्रकाशाची सावली’ या पुस्तकानं गांधी-हरिलाल संबंधांचा विस्तीर्ण पट माझ्यासाठी खुला केला. त्यातलं गांभीर्य नजरेस आणून दिलं. पण केवळ तेवढय़ामुळे मी नाटक लिहायला तयार झालो नाही. जेव्हा माझी खात्री झाली, की हरिलालचीही या संघर्षांत काही भूमिका होती आणि तिच्यानुसार जगण्याचा त्यानं यथाशक्ती प्रयत्न केला, तेव्हाच यावर वाचायला सुरुवात केली.
‘प्रकाशाची सावली’ ही फक्त सुरुवात होती. ‘हरिलाल : एक दु:खी आत्मा’ हे चंदूलाल
दलाललिखित हरिलालवरचं मूळ पुस्तक. ते एका स्नेह्य़ाकडून मिळवलं. याशिवाय रामदास गांधींची मुलगी सुमित्रा कुलकर्णी यांनी लिहिलेलं ‘अनमोल विरासत’, लुई फिशर यांनी नोंदवलेल्या गांधीजींच्या आठवणी, निर्मलकुमार पंडितांचं ‘गांधी’ या पुस्तकांमुळे एक माणूस म्हणून ‘गांधी’ कळायला मदत झाली. पण या सर्वापेक्षा गांधींनी लिहिलेल्या पत्रांचा जास्त उपयोग झाला. दक्षिण आफ्रिकेतल्या त्यांच्या वास्तव्यापासूनची त्यांची जवळजवळ सर्व पत्रं उपलब्ध आहेत. त्यांचा दिनक्रम उपलब्ध आहे. त्यांची वैचारिक भूमिका माहीत होतीच. पण नाटकात व्यक्तिरेखा उभी करताना एखाद्या विशिष्ट वेळेस ते काय विचार करीत होते? त्यांना कशाचं महत्त्व वाटत होतं? ते कशानं आनंदी किंवा अस्वस्थ होत होते? हे कळणं फार महत्त्वाचं होतं. त्या काळात त्यांची जगण्याची दृष्टी कशी विकसित होत होती? ते समजून घेण्याची गरज होती. ती बरीचशी या पत्रांनी पूर्ण केली.
यातल्या एका पत्रानं गांधीजी कुटुंबीयांचा कसा विचार करीत असतील हेही उलगडू लागलं. हे पत्र गांधींनी आपल्या वृद्ध बहिणीला लिहिलेलं आहे. गांधी बहिणीला आश्रमात राहायला बोलवत होते, पण तिथे सर्व जातीजमातींचे लोक राहत असल्यामुळे बहिणीची यायची तयारी नव्हती. मात्र, गांधी पाठवत असलेले पसे आपल्याला पुरत नाहीत, लोकांचं दळणकांडण करून आपल्याला पसे मिळवावे लागतात, अशी तिच्या पत्रात तक्रार होती. पत्रोत्तरात गांधी तिला लिहितात की, ‘‘मी माझी सगळी संपत्ती समाजाला देऊन टाकली आहे, त्यामुळे माझ्याकडे स्वत:चे असे काही नाही. तू जर आश्रमात येऊन राहिलीस तर तुला पशांची गरज राहणार नाही. पण तसं केलं नाहीस तर पाठवतोय त्या रकमेत तुला भागवावं लागेल. आणि दळणकांडण करण्यात काहीच वाईट नाही. या वयात अशी कामं करण्यानं तब्येत चांगली राहते..’’ यातल्या शेवटच्या दोन वाक्यांनी मी उडालोच. त्या काळी बायको (कस्तुरबा) आजाराचं नाटक करतेय असं दिसल्यावर ‘‘तू मेलीस तरी हरकत नाही आश्रमात लाकडं भरपूर आहेत!’’, असं गांधींनी म्हणणं कठीण नव्हतं. पण जिची आपल्यावर जबाबदारी आहे अशा वय झालेल्या बहिणीला ‘अंगमेहनत केली तर तब्येत चांगली राहते’, असं म्हणणं कल्पनेबाहेरचं होतं. हळूहळू हे लक्षात आलं की, माणूस जितका जवळचा; तितकी गांधींची त्याच्याकडून जास्त अपेक्षा असते. आणि सर्वात अधिक अपेक्षा त्यांची स्वत:कडून आहे. स्वत:विषयी ते सगळ्यात कठोर आहेत. आंदोलनात अडकलेले असतानाही स्वत:च्या शरीर आणि मनावर त्यांनी जितके प्रयोग केले, तितके क्वचितच कुणी केले असतील. दुसरी एक गोष्ट इथेच नोंदवली पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हा गांधींच्या ध्येयाचा एक भाग होता. खरं तर त्यांना चांगल्या मानवी जीवनाचं मर्म शोधून काढायचं होतं. स्वत:तलं हिणकस वजा करत करत कोणताही सामान्य माणूस दिव्यत्वापर्यंत पोहोचू शकेल अशी त्यांची धारणा होती. त्या प्रवासाची दिशा आणि मार्ग शोधून काढण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. या सगळ्याची झळ कुटुंबाला लागणं अपरिहार्य होतं!
‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकामधल्या बाप-मुलाच्या नात्याचं वैशिष्टय़ हे आहे, की वडिलांची फारशी चूक दिसत नसतानाही मुलाचं दु:ख तुम्हाला स्पर्श करून जातं. त्या काळी किती वडिलांचा मुलांशी संवाद होता? गांधींसारख्या नित्यनव्या उद्योगांत, चळवळीत गुंतलेल्या माणसाला मुलासाठी किती वेळ देता येणार? गांधींच्या शब्दाखातर फिनिक्स आश्रमात किंवा टॉलस्टॉय फार्मवर येऊन राहणारे, काम करणारे कितीतरी जण होते. त्या सर्वाना डावलून इंग्लंडमधल्या शिक्षणासाठी स्वत:च्या मुलाचं नाव गांधींनी पुढे करायला हवं होतं का? किंवा कौटुंबिक मालमत्तेवरचा हक्क सोडल्यावरही हरिलालला पेढीवर बसू द्यायला हवं होतं का? मग आजच्या राजकीय पुढाऱ्यांच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला असता?

पण मग कुणी असाही प्रश्न विचारूशकेल की, कुटुंबीयांनी तरी काय करावं? गांधी घराण्याचं ओझं डोक्यावर वागवायचं; पण फायद्यांची अपेक्षाही करायची नाही, हे शक्य होतं का? नंतर लक्षात आलं की, हरिलालचं भांडणही फक्त स्वत:साठी नव्हतं. तो स्वत:ला जणू ‘बा’चा रक्षणकर्ताच मानत होता. डॉक्टर होण्याची इच्छा असलेला धाकटा भाऊ मणिलालचा आणि त्याहूनही लहान असलेल्या रामदास, देवदासचे आपण प्रतिनिधी आहोत असं समजत होता. मुख्य म्हणजे हरिलालला स्वत:ची ओळख निर्माण करायची होती. म्हणून आफ्रिकेत चळवळीचं नेतृत्व त्याच्याकडे येण्याची शक्यता असतानाही त्यानं गांधींची साथ सोडायचं ठरवलं. त्याची ताकद मर्यादित होती. तो मनानं दुबळाच होता. आणि म्हणून त्याला सारखंच अपयश येत गेलं. हरिलालच्या दृष्टीने आदराचं स्थान गांधी; आणि शत्रूही गांधीच! किंवा ज्यांच्यासमोर त्याला स्वत:ला सिद्ध करायचंय, तेही गांधीच! त्यामुळे नाटकाच्या शेवटी कस्तुरबांना त्याची चिंता वाटणं, ‘बाप गेल्यावर तुझं कसं होणार?’ असं त्यांनी हरिलालला म्हणणं अस्वस्थ करतं!
नाटक लिहिण्या-करण्यातल्या अनेक अडचणी स्पष्ट होत्या. चरित्रात हरिलाल तरुणपणी फिनिक्सला येतो तेव्हापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतचा ४० वर्षांचा दीर्घ काळ आहे. हा उभा करणं, अनेक पात्रं आणि प्रसंग यांची गर्दी असणं, सुरुवातीचा काळ सोडला तर गांधी आणि हरिलाल यांनी कधीही फार एकत्र नसणं, शिवाय मराठीत बोलणारा गांधी प्रेक्षक स्वीकारतील का, याचीही शंका! व्यावसायिक रंगभूमीला ही सर्कस झेपेल का? असा प्रश्न. पण चंद्रकांत कुलकर्णीनं हे आव्हान स्वीकारलं आणि तो माझ्यासोबत खंबीरपणे उभा राहिला. बाप-मुलाचा हा संघर्ष सहज चिमटीत पकडण्यासारखा नव्हताच. आणि त्यामुळे मला कधी नव्हे ते प्रसंगांचे अनेक ड्राफ्ट्स करावे लागले. पुनल्रेखन करावं लागलं. चंद्रकांत, प्रशांत,
डॉ. भालचंद्र कानगोंसारखा मित्र आणि कुटुंबीय यांना त्याचं वाचन सहन करावं लागलं. यावेळी नाटक लिहिताना फॉम्र्सची मोडतोड करण्याऐवजी मानवी संबंधांच्या डोहात उतरण्याचा मी प्रयत्न केला. नाटकातला कस्तुरबा-गुलाबचा गोड प्रसंग चंद्रकांतनं नव्यानं लिहून घेतला. नाटकात तो कुठे असावा ती जागाही त्यानं दाखवली. नाटकाची उत्तम रंगावृत्ती तयार केली.
नाटकाच्या सुरुवातीला गांधींच्या मृत्यूचं सूचन होतं आणि मग हरिलालची सायन रुग्णालयात गुप्तरोगानं मृत्यू झाल्याची घोषणा होते. हळूहळू रंगमंचाच्या अवकाशात गांधी आणि हरिलाल दिसू लागतात.
गांधी : (हरिलालला-) आता तरी तुला पटलं ना, की तुझा मार्ग चुकीचा होता?
हरिलाल : नाही बापू..
..असं हळूहळू त्यांचं बोलणं सुरू होतं. चच्रेच्या शेवटी तो बापूंना विचारतो-
हरिलाल : बापू, तुम्हाला अजूनही नाही वाटत, की आपल्यात काही महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता?
गांधी : विचार केला पाहिजे.
..या संवादखंडातून नाटक जणू फ्लॅशबॅकमध्ये सुरू होतं. नाटकाच्या शेवटी ते दोघे पुन्हा भेटतात. हरिलालला गांधींचं म्हणणं पटतं असं नाही; पण तोपर्यंत त्याला आणि प्रेक्षकांना हे जाणवलेलं असतं, की लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही गांधींनी कधी हरिलालला लपवण्याचा किंवा गप्प बसवण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यांनी स्वीकारलेल्या भूमिकेची अपरिहार्य किंमत म्हणून एखादा मुलगा या वळणावर जाणार, हे गृहीत धरून ते चालले. नाटकाच्या शेवटी ते दोघे पुन्हा चच्रेच्या नव्या फेरीसाठी यमुनातीरावर निघतात.
नाटक लिहून झालं. चंद्रकांतनं ते निर्मात्यांना वाचून दाखवायला सुरुवात केली. शेवटी ‘सुयोग’चे सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी चंद्रकांतवर विश्वास ठेवून हे शिवधनुष्य उचलायचं ठरवलं. कलाकारांचा शोध सुरू झाला. हरिलालबद्दल प्रेक्षकांना फारसं काही माहीत नसल्यामुळे त्या भूमिकेसाठी समर्थ नट मिळणं, एवढंच पुरेसं होतं. पण रंगमंचावर गांधीजींचं दिसणं आणि वाटणंही खूप महत्त्वाचं होतं. सुरुवातीला एक-दोन नटांचा विचार झाल्यावर अतुल कुलकर्णीचं नाव पुढे आलं. कारण चंदू, प्रशांतला त्याचं ‘चाफा’ नाटकातलं काम खूप आवडलं होतं आणि त्यातल्या भूमिकेबद्दल त्याचं कौतुकही झालं होतं. तो ‘एनएसडी’तून नुकताच परत आला होता. त्याचं हसणं, बसणं, कानांची ठेवण चंदूला खूप गांधींसारखी वाटली. त्यानं अतुलची निवड पक्की केली. पुढे तालमींमध्ये त्याच्याशी मी गप्पा मारताना तो जे बोलला त्यानं मी पूर्ण आश्वस्त झालो. तो म्हणाला की, ‘गांधींनी स्वत:चं कार्यक्षेत्र तर निवडलंच, पण स्वत:ची वेशभूषा, स्वत:ची भाषाही निवडली!’ हे त्याचं निरीक्षण मला खूप भावलं. गांधींची इंग्रजी ही त्यांनी मुद्दाम घडवलेली सोपी इंग्रजी आहे याकडे माझे वडील बाबा दळवी यांनीही सतत माझं लक्ष वेधलं होतं हेही आठवलं. किशोर कदम हा पं. सत्यदेव दुबेंचा पट्टशिष्य. वाचिक अभिनयावर त्याचं प्रभुत्व. चंदूनं त्याला हरिलाल म्हणून उभा केला. कस्तुरबांची भूमिका अत्यंत महत्त्वाची. गांधी-हरिलाल संघर्षांचे ताण त्यांनाच जास्त सहन करावे लागले. भक्ती बर्वे-इनामदारांसारख्या सगळं नाटक एकटीनं ओढून नेण्याची क्षमता असलेल्या या अभिनेत्रीनं भूमिकेची लांबी न पाहता हे काम करण्याचं मान्य केलं. बाकी मणिलालच्या भूमिकेत संज्योत वैद्य, गुलाबच्या भूमिकेत सुनीता भोईटे आणि एकूण सगळे १२-१५ नट-नटय़ा, लहान मुलं सगळी पात्रं व्यवस्थित उभी राहत गेली.
तालमी सुरू झाल्या. चंद्रकांत दिग्दर्शक असला की, मला माझं म्हणणं पोहोचेल की नाही याची शंका नसते. या संहितेच्या ‘स्पीच’वर त्यानं अतोनात मेहनत घेतली. एकूण ६० दिवसांपकी बराच काळ बसून चंदूनं वाचन करून घेतल्यानंतर उभ्यानं तालमी सुरू झाल्या. कधी तरी मुंबईला गेल्यावर मीही तालमींना जात असे. सुरुवातीच्या आश्रमातल्या दृश्यात तरुण गांधी उभा करताना अतुलचा स्वर अचूक आणि नितळ वाटला. त्याचं बोलणं ऐकून असं वाटलं, की कुणीही गांधी या माणसाचं मन सहज वाचून काढू शकेल! गांधींच्या उठण्या-बसण्याचा, चालण्याचा, उभं राहण्याचा अतुलनं केलेला अभ्यास चकित करणारा होता. मराठी रंगभूमीवरील ‘ग्रेट’ भूमिकांमध्ये ही भूमिका गणली जाईल यात शंका नाही. हरिलाल साकारताना किशोरने वरकरणी शारीरिक फारसे बदल न करता आपल्या अभिनयातून दु:खाची जणू एक अखंड जड शिळाच आपल्या दारात उभी केली. पुढे नाटकाचे प्रयोग थांबल्यावर किशोरनं ‘हरिलाल’वर एक दीर्घ कविताच लिहिली. त्यात तो म्हणतो-
‘एखादा पाहुणा
नको नको म्हणताना
कोडग्यासारखा राह्यला यावा आपल्या घरात
तसा तू माझ्या वस्तीला आलास..
आणि खूप मन:स्ताप दिलास
तुझ्या आई-बाबांसारखाच मलाही..
..
..तू जेव्हा शिरलास माझ्यात
तेव्हा तुझं दु:ख आणि माझं दु:ख
मला फरकच करता येईना यांच्यात..’
भक्तीताई फिनिक्स आश्रमापासून सहज- साधी सुरुवात करत करत हळूहळू भूमिकेत गडद रंग भरत प्रेक्षकांना माहीत असलेल्या कस्तुरबांपर्यंत नेत. हे नाटक बसवताना चंद्रकांतनं अनेक नवे प्रयोग केले. हरिलालनं गांधींना लिहिलेल्या खुल्या पत्राच्या वेळेस पत्रातला मजकूर बोलता बोलता हरिलाल सहजच गांधींच्या रंगमंचीय अवकाशात प्रवेश करीत असे. हालचालींमधून स्थळ-काळ-कृतीचं हे बंधन सहज तोडलं जात असे. हा एक त्यातलाच प्रयोग. (पुढे प्रशांत दळवीचं ‘गेट वेल सून’ नाटक बसवताना त्यानं हा प्रकार संपूर्ण नाटकभर वापरला. भारत, अमेरिका, घर, हॉटेल अशा अनेक स्थळांवर हे नाटक बघताना त्यामुळं सहज उलगडत गेलं.) ‘गांधी’ बसवताना शिल्पा नवलकर आणि आशुतोष भालेराव हे चंद्रकांतचे साहाय्यक होते. विक्रम गायकवाडांची रंगभूषा, असिता जोशीची वेशभूषा या गोष्टी नाटकासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. मराठी नाटकात दृश्यबदलांच्या वेळेस नेपथ्याची जी अडचण चंदूला जाणवली ती त्यानं पुढे इतर भाषेतील प्रयोगांच्या वेळेस नेपथ्यरचना बदलून दूर केली.
नाटक गाजू लागलं. ‘हे नाटक पाहिल्यावर मराठी रंगभूमीचं सामथ्र्य दिसून येतं’, अशी परीक्षणं आली. लिखाणापासून दिग्दर्शन, अभिनय, सादरीकरणाबद्दल भरपूर लिहून आलं. मराठी, िहदी, गुजराती अशा तीनही भाषांत चंदूनंच दिग्दर्शन केलं.
किती तरी महत्त्वाची मंडळी नाटक पाहायला येऊन गेली. गांधींवरचं नाटक असल्यामुळे इतर भाषेतले निर्मातेही प्रयोग पाहून गेले. माझी पत्नी अनुया हिनं अनेक नाटकांचे िहदीत अनुवाद केले आहेत. या नाटकाच्या लिखाणापासूनच ती प्रोसेसमध्ये होती. तिनं दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून वेगाने िहदीत अनुवाद करून दिला. िहदी नाटकात अतुल, किशोर तसेच कायम राहिले. मात्र त्यांच्याबरोबर ‘बँडिट क्वीन’मुळे गाजत असलेली सीमा बिश्वास आता कस्तुरबा होती. पुढे गुजरातीत अतुलबरोबर हरिलाल म्हणून मनोज जोशी उभा राहिला आणि ‘बा’च्या भूमिकेत मीनल पटेल. िहदीची निर्मिती मनहर गढियानं केली, तर गुजरातीची जबाबदारी गढिया आणि राजेंद्र बुटाला या दोघांनी घेतली. इंग्रजी नाटक करताना दिग्दर्शक फिरोज खानने मोठाच घाट घातला. त्यानं नसीरुद्दीन शाहांना गांधी, के.के. मेननला हरिलाल आणि नीना कुलकर्णीना कस्तुरबा म्हणून, इंग्रजी ‘महात्मा व्हस्रेस गांधी’मध्ये उभे केले. मुक्ता राजाध्यक्ष यांनी इंग्रजीत अनुवाद केला होता. या रूपातरांचे देशात, विदेशात प्रयोग झाले. द. आफ्रिका, अमेरिका, इंग्लंड इथेही प्रयोग झाले. बोमन इराणींनीही काही काळ ‘गांधी’ साकारला. बीबीसीने इंग्लंडमधील शाळांसाठी नाटकाचे श्राव्य स्वरूपात सादरीकरण करण्याची परवानगी मागितली होती.
नसीरुद्दीन शाह अभिनित नाटकाचा राष्ट्रपती भवनात प्रयोग झाला. राष्ट्रपती के. आर. नारायणन् यांनी दिग्दर्शकाला लिहिलेल्या पत्रात ‘हे नाटक बघणं हा एक kdeeply satisfying and moving experiencel असं म्हटलं आहे. पुढे डी. एस. चौगले यांनी नाटकाचा कानडीत अनुवाद केला. तो तिथे गाजला. त्या प्रयोगाचं संगीत बी. व्ही. कारंथांचं होतं. राष्ट्रीय नाटय़महोत्सवात त्याचा प्रयोग झाला. नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून ‘पॉप्युलर’चे रामदास भटकळ सोबत असतातच. त्यांनी आणि भटकळवहिनींनी अनेक भाषांत प्रयोग पाहिले. ‘मोहनमाया’सारखं सुंदर पुस्तक लिहिणारे भटकळ गांधींचे अभ्यासक आहेतच. त्यांनी आणि अस्मिता मोहितेंनी मेहनत घेऊन ‘गांधी विरुद्ध गांधी’ पुस्तकरूपात प्रसिद्ध केलं.
या नाटकावर मी काम करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या काही मित्रांना काळजी वाटली होती. आजूबाजूला गांधीविरोधी गलका सुरू असताना त्यांच्याविरुद्ध प्रतिकूल मत होऊ शकेल असं मुळात लिहायचंच कशासाठी? असा त्यांचा प्रश्न होता. मला मात्र माझा निर्णय चुकीचा आहे असं वाटलं नाही. गांधींविषयी आदर असला तरी कुतूहल असू नये असं थोडंच आहे? आणि ते कुतूहल फक्त गांधींबद्दल नव्हतं, तर बाप-मुलाचं नातं समजून घेण्यासंबंधीचंही होतं. नाटक झाल्यावर मला आनंद झाला की गांधींचं हे मोठेपण कायम ठेवून हरिलालचं दु:ख मी मांडू शकलो आणि प्रेक्षकांनीही ते योग्य प्रकारे स्वीकारलं. जेव्हा मी पाहिलं की, नाटक पाहून परत जाणारे बरेच प्रेक्षक मुलाबरोबरच्या स्वत:च्या नात्याचा गंभीरपणे विचार करतायत, किंवा मुलाला आणून मुद्दाम नाटक दाखवतायत, तेव्हा लिहिण्याचा हेतू सफल झाल्याचा आनंद मला मिळाला! ल्ल

अजित दळवी
dalvit.ajit@gmail.com