पिंपरी पालिकेतील विरोधी पक्षनेते विनोद नढे यांची पक्षांतर्गत पातळीवर उचलबांगडी निश्चित झाल्यानंतर नव्या नियुक्तीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील राजकारण चांगलेच रंगले आहे. नढे राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत नाहीत आणि बराच काळ प्रतीक्षेत असलेले राहुल भोसले आता हे पद मिळण्यासाठी घाई करत आहेत. स्थायी समितीच पाहिजे, असा आग्रह धरणारे अपक्ष नगरसेवक आता विरोधी पक्षनेतेपदावर दावा करत असून, त्याला काँग्रेसमधील राष्ट्रवादीधार्जिण्या गटाचीच फूस आहे.
शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून राष्ट्रवादीने अपक्षांची मोट काँग्रेसशी बांधली. त्यामुळे १४ संख्याबळ असलेल्या काँग्रेसला आठ अपक्षांचे ‘बळ’ मिळाले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळाले. सुरुवातीपासून विरोधी पक्षनेतेपद वादाच्या भोवऱ्यात आहे. त्यात आता आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आजी-माजी शहराध्यक्षांमध्ये ‘पॅचअप’ केले तेव्हाच नढे यांचा राजीनामा घेऊन नव्या विरोधी पक्षनेतेपदाची प्रक्रिया सुरू करण्याचे ठरले, त्यासाठी शहरात निरीक्षक आले. मात्र, त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम सुरू आहे. नगरसेवकांशी वैयक्तिक संवाद साधण्याचा निरीक्षकांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकलेला नाही. भोईर गटाने राहुल भोसले यांच्या नावाची शिफारस केली. तथापि, भोसले यांच्यासह सद्गुरू कदम आणि शकुंतला बनसोडे या तीन नावांची शिफारस प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आली. न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याचे कारण देत नढे राजीनामा देण्यास उत्सुक नसल्याचे दिसते. यापूर्वीचे विरोधी पक्षनेते कैलास कदम यांची मुदत संपल्याचा कांगावा करून त्यांना बदलण्याचा आग्रह धरणाऱ्या नढे यांनी तोच कित्ता गिरवत पदावर चिकटून राहण्याचेच काम केले आहे. राहुल भोसले यांना एक जूनला विरोधी पक्षनेतेपद देण्याची घोषणा भोईर गटाने केली. तथापि, डिसेंबर उजाडला तरी भोसले प्रतीक्षेतच आहेत. आता अपक्षांनी या पदावर दावा केला आहे. प्रत्यक्षात, पहिल्या वर्षांपासून अपक्षांनी स्थायी समितीचीच मागणी केली आहे. आताच्या त्यांच्या मागणीचा ‘बोलवता धनी’ काँग्रेसमध्येच आहे. या सगळय़ा घडामोडींवर ‘कारभारी’ अजित पवार लक्ष ठेवून आहेत. काँग्रेसच्या दोन गटांत व्यवस्थित लावून देण्याची राष्ट्रवादीची खेळी आहे. कोणाची वर्णी लावायची, हे अजितदादा ठरवणार आहेत. राष्ट्रवादीच्या सोयीचा नगरसेवकच विरोधी पक्षनेता होईल, हे उघड गुपित आहे.

नव्या पदाधिकाऱ्याला नवी मोटार
नव्या विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीची प्रक्रिया काँग्रेस पक्षात सुरू आहे. अशातच स्थायी समितीने विरोधी पक्षनेत्याची सध्याची मोटार खराब झाली असल्याचे सांगत आठ लाख रुपये खर्चून नवीन मोटार खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्याच्या दिमतीला नवी मोटार असणार आहे.