दरात पेटीमागे पाचशे रुपयांची वाढ

अक्षयतृतीयेनिमित्त रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसची मोठी आवक गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फळबाजारात झाली. किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांकडून तयार हापूसला चांगली मागणी राहिली. अक्षयतृतीयेनंतर हापूसचे दर कमी येण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

अक्षयतृतीयेनिमित्त आंब्याला मोठी मागणी असते. अक्षयतृतीयेनिमित्त आंब्याचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर आंब्यांचा आस्वाद घेतला जातो. गेले दोन दिवस आंबा खरेदीसाठी मार्केटयार्डातील फळबाजार तसेच महात्मा फुले मंडई परिसरात गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मार्केटयार्डातील फळबाजारातील प्रमुख विक्रेते नाथसाहेब खैरे म्हणाले की मुंबई येथील फळबाजार रविवारी बंद असतो. रविवारी (२३ एप्रिल) मार्केटयार्डातील फळबाजारात रत्नागिरी हापूसच्या आठ हजार पेटयांची आवक झाली होती. अक्षयतृतीयेनिमित्त किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांची गुरुवारी (२७ एप्रिल) खरेदीसाठी गर्दी झाली होती. ग्राहकांकडून तयार हापूसला चांगली मागणी होती. यंदाच्या पोषक हवामानामुळे आंब्याचे उत्पादन चांगले झाले आहे. फळांचा दर्जा चांगला आहे. घाऊक बाजारात तयार हापूसची तीनशे ते सातशे रुपये डझन या भावाने विक्री करण्यात आली.

कर्नाटक हापूसची मोठी आवक

कर्नाटक हापूसची वीस ते पंचवीस हजार पेटय़ा एवढी आवक बाजारात झाली आहे. तुमकु र, रामनगर, हुबळी, धारवाड, भद्रावती या भागातून कर्नाटक हापूसची आवक झाली आहे. रत्नागिरी हापूसच्या तुलनेत कर्नाटक हापूसचे दर कमी आहेत. कर्नाटक हापूसची चव रत्नागिरी हापूसपेक्षा थोडी वेगळी असते. ग्राहकांकडून कर्नाटक हापूसला चांगली मागणी आहे. कर्नाटक तयार हापूसच्या डझनाचा भाव दोनशे ते चारशे रुपये आहे, अशी माहिती फळबाजारातील कर्नाटक हापूसचे प्रमुख विक्रेते रोहन उरसळ यांनी दिली.