लोहगाव विमानतळ परिसरात १५ किलोमीटर परिघामध्ये रात्री आकाशात प्रकाशझोत सोडणारे दिवे (बीमलाइट) लावण्यास बंदी घालण्याचा आदेश शहर पोलिसांनी पुन्हा एकदा काढला आहे. आतापर्यंत दोन वेळा अशाच पद्धतीचा आदेश काढला असला, तरी शहराच्या विविध भागात सर्रासपणे बीमलाइट वापरले जातात. आता नवीन पोलीस सहआयुक्तांनी दोन महिन्यांसाठी पुन्हा आदेश काढला असून, यापुढे बीमलाइटचे दिवे आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याचे सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी स्पष्ट केले आहे.
लोहगाव विमानतळावर रात्रीच्या वेळी अनेक विमानांची ये-जा सुरू असते. त्याच बरोबर भारतीय हवाई दलाची अनेक विमाने उतरत असतात. रात्री लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना परिसरात आकाशाच्या दिशेने लावणाऱ्या प्रखर प्रकाशझोतामुळे अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार भारतीय वायुसेनेच्या काही वैमानिकांनी केली होती. विशेषत: वायुसेनेच्या दोन वैमानिकांना या दिव्यांचा त्रास झाल्याची गंभीर दखल हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने घेतली होती. त्यावरून दोन वर्षांपूर्वी विमानतळ प्रशासनाने पुणे पोलीस आयुक्तालयाकडे ही तक्रार केली. त्यानुसार विमानतळापासून पंधरा किलोमीटर अंतरावर म्हणजे हडपसर, बिबवेवाडी, डहाणूकर कॉलनी, औंध, पिंपरीपर्यंतच्या सर्वच ठिकाणी अशा आकाशात झोत सोडणाऱ्या प्रखर दिव्यांना बंदी घालण्यात आली होती.
याबाबत मॉल, हॉटेल यांना असे दिवे काढून टाकण्याच्या आणि यापुढे न लावण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. मुंढवा भागातील काही हॉटेलमध्ये अशा प्रकारचे दिवे लावण्यात आले होते. ते काढण्यात आले आहेत. मिरवणूक, कार्यक्रमांच्या वेळीही असे दिवे लावता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण, असे आदेश काढूनही कोंढवा, मुंढवा, म्हात्रे पूल, येरवडा परिसरात बीमलाइट सर्रासपणे सुरू होत्या. या बीमलाइटवर काहीच कारवाई केली नव्हती. पुण्याचे सहपोलीस आयुक्त म्हणून रामानंद यांनी सूत्रे घेतल्यानंतर पुन्हा या बीमलाइटवर बंदीचा आदेश काढला आहे. रात्री सहा ते सकाळी सहा दरम्यान बीमलाइट लावण्यास बंदी राहणार आहे. सध्याचा आदेश हा दोन महिन्यांसाठी काढण्यात आला आहे. याबाबत रामानंद यांच्याशी संपर्क साधून मागील वेळी असा आदेश काढल्यानंतरही बीमलाइट सुरू असल्याबाबात विचारणा केली असता यापुढे असे होणार नाही. बीमलाइट सुरू ठेवणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.