रोकड टंचाई, पैसे काढण्याच्या मर्यादेमुळे नोकरदारांचे व्यवहार थंडावले

नोकरदार, मध्यमवर्गीय ज्याची वाट पाहतात तो पगाराचा दिवस आज होता. अनेकांचा पगारही बँकांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. मात्र आपल्या हक्काचा हा पैसा काढण्यासाठी नोकरदारांना बँका आणि एटीएम केंद्रांबाहेर रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र गुरुवारी शहरात होते. संपूर्ण पगार होऊनही पैसे काढण्याच्या मर्यादेमुळे पगारातील किती पैसे मिळतील, याबाबतची अनिश्चितता मध्यमवर्गाला भेडसावत आहे. त्या बरोबरच गृहिणी, विद्यार्थिनी, छोटे व्यावसायिक तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नियोजनही बिघडल्याचे चित्र आहे.

समाजातील विविध घटकांशी संवाद साधताना नागरिकांनी व्यक्त केलेल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया..

एटीएम मशिनमधून पैसे काढण्यासाठी मला सकाळीच बाहेर पडावे लागते.  पुरेसे पैसे नसल्यामुळे बहुतांश एटीएम बंदच असतात. पुन्हा एटीएम शोधण्यात खूप वेळ जातो. रांगेत उभे राहूनही बहुतेकदा दोन हजाराची नोटच हातात पडते. दुकानात नाइलाजाने हजार रुपयांपर्यंतची खरेदी करावी लागते. त्याचा महिन्याच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होत आहे.

हेमलता ओक, गृहिणी

मी व्यायामशाळेत प्रशिक्षकाचे काम करतो. माझा पगार जमा झाला आहे. पण जवळ खर्च करण्यासाठी काहीच पैसे नाहीत. त्यामुळे माझी एटीएमसाठी शोधाशोध सुरू आहे. एटीएम केंद्रांसमोरील रांगा आणि बँकांमधील गर्दी लक्षात घेता एटीएममधून पैसे मिळतील की नाही, याची खात्री नाही.

प्रतीक तांबट, प्रशिक्षिक

मी सरकारी कर्मचारी आहे. पगाराचे पैसे काढण्यासाठी बऱ्याचदा मला अध्र्या दिवसाची सुट्टी घ्यावी लागत आहे. सुट्टी घेतली नाही तर बँकेत किंवा एटीएममध्ये जाता येत नाही. त्यातच एटीएम केंद्रांमध्ये पाचशे, शंभर रुपयांच्या नोटांची कमतरता आहे. त्यामुळे दोन हजार रुपये काढावे लागतात. पण त्यानंतर सुट्टय़ा पैशांचा प्रश्न निर्माण होतो.

अविनाश भालघरे, सरकारी कर्मचारी

निवृत्तिवेतनाचे पैसे काढण्यासाठी अनेकदा बँकेत चकरा माराव्या लागतात. वयोमानामुळे जास्त वेळ मला रांगेत उभे राहता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतीही सुविधा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

पांडुरंग भोसले, निवृत्तिवेतन धारक

कर्मचाऱ्यांना मला रोख पैसे द्यावे लागतात. त्यामुळे बँकेतून आणि एटीएममधून मिळणारे पैसे मला पुरतच नाहीत. जेवढय़ा रकमेची हमी सरकारकडून देण्यात येत आहे, तेवढी रक्कम बँकेतून काढण्यावर मर्यादा येत आहेत. तेवढी रक्कम बँकेतून एकावेळी मिळत नाही.

अपर्णा देशपांडे, ब्युटी पार्लर व्यावसायिक

सांगलीतून वडील खात्यात पैसे भरतात. मात्र एटीएम बंद असल्यामुळे पैसे काढण्यात मला खूप अडचणी येतात. मोठय़ा रांगा लावूनही पैसे मिळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे अनेकदा महाविद्यालयातील उपस्थिती व अभ्यासावर परिणाम होत आहे.

मृण्मयी पाठक, विद्यार्थिनी

निवृत्तीनंतरचे सर्व पैसे बँकेत माझ्या खात्यामध्ये जमा झाले. सरकारच्या काही अटींमुळे ते पैसे काढण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

शिवाजी गोखले, निवृत्त बँक कर्मचारी