राज्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर विविध गणेश मंडळांनी यंदा विसर्जन मिरवणूक रद्द करून विधायक कामांना मदत केली आहे.
नवी पेठ विठ्ठल मंदिर येथील शिवांजली मित्र मंडळाने सामाजिक जाणिवेतून पुरंदर तालुक्यातील खळद या दुष्काळग्रस्त गावातील पाणीयोजनेसाठी २१ हजार रुपयांची मदत केली. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे आणि हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर यांच्या हस्ते ‘आम्ही खळदकर ग्रामविकास’ संस्थेचे कार्याध्यक्ष आबा रासकर यांना धनादेश दिला. नंदू कामथे, राजू कादबाने, अशोक खळदकर, वसंत इभाड या वेळी उपस्थित होते.
पर्वती पायथा येथील आझाद मित्र मंडळाने विसर्जन मिरवणूक रद्द करून विविध विधायक कामांसाठी रक्कम खर्च केली. दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांचे शुल्क, अनाथ मुलींच्या आश्रमशाळेस संगणक, देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शालेय अभ्यासक्रमाच्या सीडी,  विश्रांतवाडी येथील कर्णबधिर विद्यालयासाठी धान्य आणि किराणावाटप, आदिवासी मुलींच्या आश्रमशाळेस साहित्यवाटप, ग्रंथालयांसाठी पुस्तकांचे वाटप, तुळजापूर येथील चारा छावणीतील जनावरांचा एक दिवसाचा चारा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निधी अशा उपक्रमांसाठी हा निधी देण्यात आला, असे मंडळाचे अध्यक्ष अक्षय राऊत यांनी सांगितले.
पोलिसांना भोजन पाकिटांचे वाटप
श्री बालाजी मंदिर नारायण पेठ महिला मंडळातर्फे बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरी संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांसाठी एक हजार भोजन पाकिटांचे वाटप करण्यात आले. विजय चित्रपटगृहाजवळील शेडगे विठोबा मंदिराजवळ मंडपामध्ये मोफत जलसेवा आणि सरबतवाटप करण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षा शारदा राठी आणि सीता राठी यांनी हा उपक्रम राबविला. वडगाव बुद्रुक येथील श्रीकृष्ण मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सर्व मंडळांना गणेश प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.