‘माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण एका खेडय़ात झाले. इथल्याच एका छोटय़ा शहरात माझे महाविद्यालयीन शिक्षण झाले. अभियांत्रिकीची पदवी देखील मी भारतातच प्राप्त केली. याच देशात घेतलेल्या शिक्षणावर मी ‘रॉकेट अभियंता’ म्हणून भरारी घेतली. तुम्हाला महान बनवण्यासाठी हा देशच सक्षम आहे..’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बोलत होते आणि विद्यार्थी अक्षरश: मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.
‘कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूट्स’ या समूहाच्या विविध शिक्षण संस्थांमधील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांशी कलाम यांनी सोमवारी संवाद साधला. ‘तुम्ही आत्ता शाळेत असता तर तुम्हाला भारतात शिकायला आवडले असते की परदेशात?’ या एका विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कलाम यांनी विद्यार्थ्यांना, देशातच शिक्षण घेऊनही खूप मोठे ध्येय साध्य करता येते, असा प्रेरक मंत्रच दिला.
‘तरूणाईला भविष्याची चिंता करण्याचे कारण नाही. तुमच्यातील प्रत्येक जण वेगळा आहे. ते वेगळेपण ओळखा. सर्वोच्च ठिकाणी नेहमीच तुमच्यासाठी जागा असणार आहे हे विसरू नका,’ या मुद्यावर कलाम यांनी भर दिला. ते म्हणाले, ‘‘ज्ञानाचे समीकरण सोपे आहे. कल्पनाशक्ती, हृदयातला भलेपणा आणि धैर्य या तीन गोष्टींची बेरीज म्हणजे ज्ञान. शिक्षणाने कल्पनाशक्तीला चालना मिळते, कल्पनाशक्ती व्यक्तीला विचारप्रवण करते. या विचारातून मिळालेले ज्ञानच व्यक्तीला महान बनवते.’’
कलाम यांनी विद्यार्थ्यांना यशस्वितेची चार सूत्रेही सांगितली. ते म्हणाले, ‘‘वयाच्या सतराव्या वर्षांपर्यंत, फारतर विसाव्या वर्षांपर्यंत आयुष्याचे ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. ते ध्येय गाठण्याच्या दृष्टीने सतत ज्ञान मिळवत राहणे आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द बाळगणे ही चार सूत्रे लक्षात ठेवा. लहान ध्येय बाळगणे हा एक प्रकारचा गुन्हाच आहे! ध्येयाकडे जाताना आपल्याच कल्पनांच्या मर्यादा पार करा. ‘मी काय देऊ शकतो,’ हे तत्त्वज्ञान बाळगणेही खूप महत्त्वाचे आहे.’’