पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या सांस्कृतिक धोरणानुसार शहरात लावणी, नाटय़ महोत्सव, नृत्यस्पर्धा व्हाव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. सर्वाच्या सूचना विचारात घेऊनच अंतिम धोरण ठरवण्याचे आवाहन महापौर मोहिनी लांडे यांनी केले.
महापालिकेने आंतरमहाविद्यालयीन युवक नाटय़ महोत्सवाचे आयोजन करावे, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे द्यावीत, अशी सूचना राजू मिसाळ यांनी केली. लावणी महोत्सवाचे आयोजन करण्याची मागणी श्रीरंग बारणे यांनी केली. तर, लोककलेत ठाकरी व कोळी गीतांचा समावेश करण्याची मागणी रामदास बोकड यांनी केली. युवकांसाठी गायन, वादन व नृत्यस्पर्धा घ्याव्यात, अशी मागणी अनंत कोऱ्हाळे यांनी केली. सांस्कृतिक धोरण ठरवताना सांस्कृतिक संस्था प्रमुखांचा व नागरिकांच्या सूचना विचारात घ्याव्यात, असे आवाहन महापौरांनी केले. सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा कुलकर्णी, संजय कांबळे यांनी सादरीकरण केले. अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.