पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेसच्या वाटणीला आलेल्या एकमेव चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेल्या शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी शेवटच्या क्षणी इच्छुकांमध्ये नाव दिले. तथापि, आजारपणाचे कारण देत मुलाखत टाळली. अन्य इच्छुकांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष बदला व नंतरच उमेदवारी जाहीर करा, अशी आग्रही मागणी निवड समितीपुढे केली.
जागावाटपाच्या तिढय़ामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होणार की नाही, अशी संभ्रमावस्था असताना काँग्रेसने चिंचवडमधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, सहप्रभारी श्योराज वाल्मिकी यांच्या उपस्थितीत प्रदेश सचिव सचिन साठे, नगरसेवक कैलास कदम, माजी नगरसेवक बाबा तापकीर, हरेश तापकीर, संदेश नवले, अशोक मोरे आदींनी मुलाखतीत आपापली भूमिका नेत्यांसमोर मांडली. भोईरांनी शेवटच्या क्षणी इच्छुकांमध्ये अर्ज दाखल केला. मात्र ते मुलाखतीला गेले नाहीत.