पिंपरी -चिंचवडचे ‘कारभारी’ असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मावळ व शिरूर लोकसभेतील निकालाने चांगलाच धक्का बसला आहे. उद्योगनगरीतील चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि मावळ अशा चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला लांब मागे टाकत शिवसेनेच्या उमेदवारांनी दमदार आघाडी घेतल्यामुळे अजितदादांची कोंडी झाली असून, मुख्यमंत्रीपदासाठी आतूर असलेल्या अजितदादांना या जागांसाठी रणनीती बदलावी लागणार आहे.
मावळ व शिरूरच्या दोन्ही जागा शिवसेनेने कायम राखून राष्ट्रवादीसमोर आगामी विधानसभेसाठी कडवे आव्हान ठेवले आहे. मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या व शहरातील तीनही मतदारसंघासह मावळ विधानसभेची जागाजिंकण्यासाठी आतापासूनच आतूर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लोकसभेच्या निकालाने चांगलाच दणका बसला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीची बालेकिल्ल्यातच वाताहात झाल्याचे चित्र पुढे आले आहे.
मावळ लोकसभेतून श्रीरंग बारणे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांचा, तर शिरूर लोकसभेतून शिवाजीराव आढळराव यांनी देवदत्त निकम यांचा दारूण पराभव केला. गेल्या लोकसभेतही या जागा सेनेकडेच होत्या. तथापि, त्या कायम राखताना शिवसेनेचे वाढलेले मताधिक्य राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आणणारे आहे. मावळ लोकसभेतील चिंचवड, पिंपरी आणि मावळ विधानसभेच्या क्षेत्रात बारणे यांनी घसघशीत मताधिक्य घेतले. आढळरावांनी भोसरीतून तब्बल ८८ हजारांची आघाडी घेतली. या दोन्ही गोष्टी अजितदादांच्या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या आहेत.
अजितदादा िपपरी-चिंचवडचे कारभारी आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आहे. शहरातील चिंचवड,पिंपरी आणि भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विचारांचे आमदार आहेत. अजितदादांनी मावळ विधानसभेवर लक्ष्य केंद्रित केल्यापासून राष्ट्रवादीचा प्रभाव तेथे वाढतो आहे. अशा परिस्थितीत लोकसभेच्या निकालामुळे राष्ट्रवादीची तथा अजितदादांची घोर निराशा झाल्याचे चित्र पुढे आले आहे. बारणेंनी मावळ विधानसभेत ४० हजार, चिंचवड विधानसभेत ६४ हजार आणि िपपरी विधानसभेत ५५ हजाराचे मताधिक्य घेतले. दुसरीकडे, गेल्या वेळी भोसरीत २७ हजाराचे मताधिक्य घेणाऱ्या आढळरावांनी यंदा ८८ हजाराचा आकडा ओलांडला. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना चिंचवड आणि िपपरी विधानसभेत मिळालेली मते पाहता आगामी काळात राष्ट्रवादीची काय अवस्था राहील, याची चिंता कार्यकर्ते आतापासूनच व्यक्त करू लागले आहेत.
राष्ट्रवादीशी काडीमोड घेत शेकाप व मनसेच्या मदतीने लक्ष्मण जगतापांनी मावळसाठी मांडलेले समीकरण मोदी लाटेमुळे यशस्वी ठरू शकले नाही, त्यांचा दारूण पराभव झाला. आता चिंचवडची जागा कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीला बरीच कसरत करावी लागणार आहे. शिवसेनेच्या वाढत्या ताकदीचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. त्यात जगताप नेमकी काय भूमिका घेतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे. िपपरीचे आमदार अण्णा बनसोडे राष्ट्रवादीचेच आहेत. त्यांच्या पट्टय़ात घडय़ाळ चालले नाही आणि कपबशी देखील नाही. दोन्हींची मिळून होईल, त्यापेक्षा अधिक मते बारणे यांनी घेतली. महायुतीचे उमेदवार अमर साबळे यांनी गेल्या वेळी बनसोडेंना चांगलीच लढत दिली होती. आगामी निवडणुकीत बनसोडेंना महायुतीशीच दोन हात करायचे आहेत. त्यामुळे त्यांची दमछाक होईल, असेच संकेत या निकालातून मिळत आहेत. विलास लांडे लोकसभेला पडले आणि भोसरी विधानसभेला निवडून आले. आताही त्यांनी खासदारकीपेक्षा विधानसभेलाच प्राधान्य दिले असल्याने ते िरगणात राहतील, याविषयी शंका नाही. आक्रमक विरोधक व ‘गृहकलहा’ मुळे त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी लोकसभेच्या निकालाने वाढल्या आहेत. मावळ विधानसभा म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. तो राष्ट्रवादीने ताब्यात घ्यावा, यासाठी अजितदादा कमालीचे आग्रही आहेत. मावळात बारणेंनी आघाडी घेतली. तथापि, राष्ट्रवादीला अपेक्षित मतदान झाले नाही. आता विधानसभेत राष्ट्रवादी विरूध्द भाजप अशीच लढत असून तेव्हा सध्याच्या ‘मोदी लाटे’वर स्वार होण्याचा प्रयत्न भाजप नेते करण्याची संधी सोडणार नाहीत.