नोटाबंदीमुळे देशाचा काही फायदा झाला नसून अद्यापही भ्रष्टाचार होत आहे, त्यामुळे नोटाबंदीचा प्रयोग फसला आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. नोटाबंदीच्या अपयशानंतर भ्रष्टाचार, दहशतवाद आणि काळा पैसा यावर भाजप सरकार एका शब्दाने बोलत नसल्याचे दिसत आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन नोटाबंदीचा विरोध केला असता तर देशात तीव्र आंदोलन निर्माण  झाले असते. हे करण्यात विरोधक अपयशी ठरले असल्याची खंत चव्हाण यांनी वसंत व्याख्यानमालेमध्ये व्यक्त केली. यावेळी चव्हाण म्हणाले की, नोटाबंदीचे अपयश झाकण्यासाठी भाजप सरकारने आपला मोर्चा डिजिटल व्यवहाराकडे वळविला आहे. डिजिटल व्यवहाराची सक्ती केली जात आहे हे लोकशाहीच्या मूल्यास धरुन नाही.

नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था कोलमडण्याची भिती निर्माण झाली आहे. कॅशलेस व्यवहारात लोकांचे आधार कार्ड, बॅंक खाते, एटीएम हॅक केले जाणार नाहीत, याची शाश्वती भाजप सरकार देणार आहे का? कॅशलेस व्यवहारातही भाजपचा छुपा अजेंडा आहे. असे निर्णय घेण्यासाठी कोण भाग पाडायला लावत आहे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याआधी, नोटाबंदी हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळातील सर्वात मोठा घोटाळा आहे असे चव्हाण यांनी म्हटले होते. नोटाबंदी करून किती काळा पैसा बाहेर आला, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्पष्टीकरण देत नाहीत. त्यामुळे त्यातून काय साध्य झाले, असा प्रश्न उपस्थित करून चव्हाण यांनी नोटाबंदीची संसदीय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा रोजगार गेला. नोटाबंदी करून काळा पैसा नष्ट करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. मात्र काळा पैसा नष्ट झाला नाही. केवळ घोषणाबाजी करणाऱ्या सरकाराला जाब विचारण्याची वेळ आली आहे, असेही चव्हाण म्हणाले यांनी म्हटले होते.