राज्याच्या गृहविभागाचा महत्त्वाचा भाग असलेला कारागृह विभाग आता हायटेक बनू लागला आहे. राज्यातील सर्व कारागृहातील कैद्याची माहिती ठेवण्यासाठी ‘प्रिझम्स’ या नवीन सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्यात आली असून सर्व कारागृहात तिचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कारागृहातील सर्व माहितीची नोंद ठेवण्यासाठी आता कागदांची आवश्यकता लागणार नाही. कारागृहातील माहिती आता संगणकावर ठेवण्यास सुरू केल्यामुळे प्रशासकीय कामकाज आता सोपे झाले आहे.
राज्यात मध्यवर्ती, जिल्हा, खुली कारागृह आणि एक खुली वसाहत अशी एकूण ४८ कारागृह आहेत. त्यातील कैद्यांची संख्या आहे, तब्बल २४ हजार. इतकेच नव्हे तर कारागृहात येणाऱ्या-जाणाऱ्या कच्च्या कैद्यांची संख्यासुद्धा मोठी आहे. त्याबरोबरच कैद्यांच्या न्यायालयातील तारखा, त्या कोणत्या न्यायालयात आहेत, फलरे-पॅरोल या सुट्टय़ांवर गेलेले कैदी, कैद्यांना हजर करण्यासाठी पोलीस विभागाचे पथक मागविण्यासाठीचा पत्रव्यवहार, अशा सर्व गोष्टींच्या नोंदी कारागृह विभागाला रजिस्टरमध्ये ठेवाव्या लागत होत्या. त्यातून बराच गोंधळ होण्याची शक्यता असते.. या समस्येवर मात करण्यासाठी कारागृह विभागाने ‘प्रिझम्स’ नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांचा एक डेटाबेस तयार होऊन या विभागाचे काम सोपे, सुटसुटीत व्हावे होणार आहे.
राज्य कारागृहाने अलिकडे सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाइल जॅमर या यंत्रणाबरोबरच कारागृहाचे संगणकीकरण केले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरास सुरुवात केली आहे. त्याच्यापाठोपाठ आता ‘प्रिझम्स’मुळे त्यात भरच पडणार आहे. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अगरवाल यांच्या पुढाकाराने हे सॉफ्टवेअरचे तयार करण्यात आले असून त्याचा वापर व्हावा, यासाठी राज्य कारागृह विभागाला दोनशे संगणक देण्यात आले आहेत.
याबाबत येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले, की कारागृहाचे संगणकीकरण झाल्यामुळे कैद्यांच्या नोंदी ठेवणे सोपे जाणार आहे. कारागृहातून न्यायालयातील तारखांना पाठविले जाणारे कैदी, नवीन येणारे कैदी, जामीन मिळण्याचा आदेश, कैद्यांना दिल्या जाणारे फलरे-पॅरेल या सुट्टय़ा, कैद्यांच्या न्यायालयाच्या पुढील तारखा या सर्वाची रजिस्टरमध्ये नोंद करावी लागत होती. मात्र, आता या सॉफ्टवेअरमुळे नाव किंवा तारीख टाकली की त्या दिवशी न्यायालयात कोणाला न्यायचे यांची यादी मिळेल. तसेच, कोणत्या न्यायालयात त्यांचा खटला सुरू आहे हे पाहण्यासाठी रजिस्टर चाळत बसावे लागणार नाही. या प्रिझम्स सॉफ्टवेअरवर काम सुरू झाल्यामुळे सर्व रेकॉर्ड तयार राहील. त्याबरोबर सर्व आकडेवारी काढणे सोपे जाणार आहे.