गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेले काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे रहस्य अखेर उलगडले. काँग्रेसने भोसरीसाठी माजी महापौर हनुमंत भोसले, पिंपरीसाठी एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे व चिंचवडसाठी नगरसेवक कैलास कदम यांना उमेदवारी दिली. तर, राष्ट्रवादीने गेल्या वेळी पत्ता कापलेल्या भोसरीचे आमदार विलास लांडे यांच्यावर यंदा विश्वास दाखवून उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीत असूनही शिवसेनेच्या उमेदवारीसाठी फिल्डींग लावलेल्या माजी नगरसेवक नाना काटे यांना सेनेकडून नकारघंटा मिळाली. त्यानंतर, अजितदादांच्या आग्रहामुळे त्यांनी चिंचवडसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारीविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. तीनही मतदारसंघ राष्ट्रवादी लढवणार, अशी घोषणा अजितदादांनी केली, तेव्हापासून दोन्ही काँग्रेसमधील संघर्ष वाढला होता. आघाडी तुटल्यानंतर काँग्रेसने बरीच शोधाशोध करून उमेदवारांची निश्चिती केली. विलास लांडे आपल्यामुळे निवडून आले होते, असे जाहीरपणे सांगणारे हनुमंत भोसले यांनाच लांडे यांच्याविरोधात उमेदवारी मिळाली आहे. माजी उपमहापौर गौतम चाबुकस्वारांनी काँग्रेसऐवजी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारल्यानंतर पिंपरीतील स्पर्धा संपुष्टात आली, त्याचा लाभ मनोज कांबळे यांना झाला. पिंपरी मतदारसंघातील खराळवाडीचे प्रतिनिधित्व करत असतानाही कैलास कदम यांना चिंचवडची उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडमध्ये असलेली एकगठ्ठा कोकणी समाजाची मते, हे त्यामागेच कारण आहे. लांडे यांच्या निर्णयाविषयी उत्सुकता होती. तथापि, त्यांनी राष्ट्रवादीचीच उमेदवारी स्वीकारली. तर, चिंचवडसाठी राष्ट्रवादीने लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात त्यांच्या प्रभावक्षेत्रातील नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. बहुतांश उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.