‘‘लोकप्रतिनिधींचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्या विधायक व नियमानुसार असलेल्या सूचनांचा विचार केला पाहिजे. मात्र, आपण सत्ताधाऱ्यांचे बाहुले म्हणून काम करणार नाही, आपले कार्यच योग्य ते उत्तर देईल,’’ असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी ठामपणे सांगितले.
पिंपरीचे माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय दबावापोटी बदली झाल्यानंतर जाधव नवे आयुक्त म्हणून आले. त्यांची नियुक्त राजकीय असल्याचीही टीका झाली. या पाश्र्वभूमीवर जाधव यांनी, आपण सत्ताधाऱ्यांचे बाहुले बनणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘आपल्याकडून पक्षीय भेदाभेद होणार नाही. आपल्यादृष्टीने सर्वजण सारखेच आहेत,’ असेही ते म्हणाले.
मावळ बंद नळयोजना पूर्ण करणार
गोळीबाराच्या घटनेनंतर बंद पडलेल्या िपपरी पालिकेच्या मावळ बंदनळ योजनेचे काम पुन्हा सुरू करण्याचा मानस जाधव यांनी व्यक्त केला. कितीही कष्ट पडले तरी तो प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत मोठे रस्ते असावेत, असमतोल न राहता विकासाची कामे व्हावीत, याकडे आपले लक्ष राहणार आहे. समाविष्ट गावांवर अन्याय होणार नाही, तेथील लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे ‘लॉिबग’ करणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मावळ प्रकल्पाच्या कामात पालिकेचा पैसा अडकून पडला आहे. काम पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी लागणार असून अवघड व आव्हानात्मक असले तरी हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेणार आहे. सर्वाना बरोबर घेऊन काम केल्यास यश मिळते, यावर आपला विश्वास आहे. शहरात संमिश्र लोकवस्ती, प्रशस्त रस्ते, विविधांगी प्रकल्प, पाण्याची मुबलकता आहे. राज्य शासनाने नुकतेच २६७ दशलक्ष लिटर पाणी मंजूर केल्याने भविष्यात पाणीटंचाई जाणवणार नाही. नेहरू अभियानातून मिळालेल्या निधीमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत िपपरी-चिंचवड अतिशय सुनियोजित शहर आहे. पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य या सुविधा पुरवण्यास प्राधान्यक्रम राहणार असून आधीचे मोठे रस्ते सुशोभित तसेच नव्या गावात मोठे रस्ते करायचे आहेत. शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत मोठे रस्ते असावेत. काही रस्ते मोठे असले तरी ते परिपूर्ण वाटत नाहीत. त्यासाठी अनेक बारकाव्यांवर लक्ष द्यावे लागणार आहे. जागोजागी तुटलेले पदपथ पाहता, ते सिमेंटचे होणे केव्हाही चांगले, असे वाटते.
रस्त्यावर राडारोडा, अस्वच्छता असू नये, यासाठी नीटनेटकेपणा अपेक्षित आहे. यापुढे अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, यासाठी कटाक्ष राहणार आहे. जकात रद्द झाल्यानंतर उत्पन्नात घट झाली, तरी पालिकेची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट नाही. चांगल्या ठेवी आहेत. उत्पन्नाचे नवनवे मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकारी व कर्मचारी निश्चितपणे चांगले काम करतात. उगीचच कोणावर कारवाई करणे आवडत नाही. आपल्याला कोणी निलंबित केल्यावर कसे वाटेल, याचा विचार नेहमी करतो. मात्र, कोणत्याही गोष्टीचे अति होता कामा नये. सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याची आपली कार्यपध्दती असून कोणालाही तक्रारीची संधी देणार नाही, असेही ते म्हणाले.
‘सारथी’ प्रकल्प सुरूच राहणार
श्रीकर पदरेशी यांनी केलेला ‘सारथी’ प्रकल्प सुरूच राहणार असून त्यात आणखी विभाग सुरू करण्यात येतील. शाळांच्या कारभारात सुधारणा हवी. खासगी शाळांच्या तुलनेत कुठेही कमी पडणार नाही. आवश्यक निधी खर्च करू. गरीब घरातून आलेले विद्यार्थी बुध्दिमान असतात, त्यांना अधिकच्या सुविधा देऊ, असे ते म्हणाले.