पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या व त्या अनुषंगाने वाढत असलेली गुन्हेगारी पाहता भविष्यकाळात शहरातील गुन्हेगारी कारवायांवर अंकुश ठेवणे आव्हानात्मक ठरणार आहे, असे सूचक वक्तव्य यापूर्वीचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी ‘जाता-जाता’ केले होते. आता नवे पोलीस उपायुक्तपदाची सूत्रे घेतलेल्या डॉ. राजेंद्र माने यांना हे आव्हान प्रत्यक्षात पेलायचे आहे. निवडणुकांमुळे तापलेल्या राजकीय वातावरणात शांतपणे निवडणुका पार पाडण्यासाठी ‘उपद्रवी’ मंडळींचा योग्य वेळी ‘बंदोबस्त’ करावा लागणार आहे.
जवळपास २० महिन्यांची कारकीर्द लाभलेले शहाजी उमाप यांची पोलीस उपायुक्तपदावरून नुकतीच बदली झाली; त्यांच्या जागी पुण्यातील डॉ. माने यांची वर्णी लागली आहे. माने यांनी पुणे तसेच सोलापूर येथे काम केले असून निवडणूक काळात त्यांना पिंपरी-चिंचवड या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ‘कामगिरी’ करून दाखवायची आहे. अपुरे पोलीस कर्मचारी, वाढते शहर, लोकसंख्या आणि राजकीय दबाव अशा परिस्थितीत नव्या पोलीस आयुक्तांना काम करावे लागणार आहे. उमाप यांनी कारकिर्दीचा आढावा घेताना शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर सूचक वक्तव्य केले होते. त्यावर अंकुश ठेवण्याचे आव्हान भविष्यकाळात राहणार असल्याचे मत व्यक्त केले होते. पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या तक्रारदाराला न्याय मिळवून देण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यादृष्टीने पोलिसांची सकारात्मक दृष्टी असावी. समाजात असतात, त्याच अपप्रवृत्ती पोलिसांमध्येही आहेत. पोलिसांकडून चुकीची कारवाई होते म्हणूनच खात्याची सर्वाधिक बदनामी होते. त्यामुळे पोलिसांनी सदसद्विवेकबुद्धीने काम करावे. पोलीस व प्रसारमाध्यमांमध्ये सुसंवाद असणे अपेक्षित आहे. संपूर्ण कारकिर्दीत आपल्यावर राजकीय दबाव आला नाही व तशा दबावाची कधी चिंताही केली नाही. बदली राजकीय दबावातून नव्हे तर प्रशासकीय स्वरूपात झाली. राजकीय व्यक्तींच्या सूचना विधायक व नियमाला धरून असतील तर त्याचा स्वीकार करण्यास हरकत नाही, असे मनोगत त्यांनी तेव्हा व्यक्त केले होते. उमापांनी केलेले सूतोवाच नव्या आयुक्तांना निश्चितच लक्षात घ्यावे लागणार असून ‘त्या’ अनुभवातून आपल्या कामाची दिशा ठरवावी लागणार आहे.