‘मोदी सरकारने दिलेला शब्द पाळला’ 

ज्या विषयावरून पिंपरी -चिंचवड शहराचे राजकारण ढवळून निघाले, तो ‘स्मार्ट सिटी’चा विषय केंद्र आणि राज्य सरकारने मार्गी लावल्याचा दावा शहर भारतीय जनता पक्षाने शनिवारी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील नवी मुंबई महापालिकेने यातून बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याने त्या रिक्त जागेवर पिंपरी -चिंचवडची वर्णी लावण्याची शिष्टाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दोनच दिवसांत याबाबतचे अधिकृत पत्र महापालिकेला प्राप्त होईल, असे सांगत मोदी सरकारने शहरवासीयांना दिलेला शब्द पाळल्याची भावना शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व खासदार अमर साबळे यांनी या वेळी व्यक्त केली.

देशभरातील १०० शहरे स्मार्ट करण्याच्या या योजनेसाठी राज्य सरकारने पुणे व पिंपरी महापालिकेचा एकत्रित प्रस्ताव पाठवला, त्यातून पुण्याची निवड झाली. मात्र, पिंपरीला डावलण्यात आले. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले होते.

केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपला िखडीत गाठण्यासाठी राष्ट्रवादीने या विषयावरून रान पेटवले. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आगामी निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी पिंपरीचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश करून घेत शहरवासीयांना नववर्षांची भेट दिली. हा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे, केंद्राचे पैसे परत पाठवण्याची नामुष्की व पुण्यासमवेतचा संयुक्त प्रस्ताव ही िपपरीला डावलण्यात आल्याची प्रमुख कारणे होती. आता ‘स्मार्ट सिटी’त समावेश होणार असल्याने शहरासाठी भरीव निधी मिळेल, असे जगताप व साबळे यांनी सांगितले.

पिंपरीच्या समावेशासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील होते. पुण्यात व्यंकय्या नायडू यांनी या बाबतचे सूतोवाच केले होते. दिलेला शब्द पाळून स्मार्ट सिटीत िपपरीचा समावेश होत असल्याने शहरविकासाला चालना मिळेल.

लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, िपपरी भाजप