कचऱ्यावर प्रक्रिया करून निर्मिती करण्यात आलेल्या इंधनाच्या साहाय्याने भविष्यामध्ये ‘पीएमपी’ धावणार आहे. त्याचबरोबर ओल्या कचऱ्यापासून निर्माण केलेल्या इंधनाद्वारे तीन हजार व्यक्तींचा स्वयंपाक करण्याचे तंत्रज्ञान वापरामध्ये आणण्यात पुण्यातील पर्यावरणतज्ज्ञाला यश आले आहे. ‘कचऱ्यापासून लक्ष्मी’ म्हणजेच ‘वेस्ट टू एनर्जी’ हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न आहे.
ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधनाची निर्मिती करण्याचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. त्याद्वारे किमान दहा बसेस धावू शकतील. औंध येथील ब्रेमेन चौकामध्ये सुरू असलेल्या या प्रकल्पातून दररोज २५ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून ५०० लीटर इंधनाची निर्मिती करण्यात येत आहे. या इंधनाच्या साहाय्याने किमान दहा बसेस धावू शकणार आहेत, अशी माहिती प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ आणि गंगोत्री इको टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष गोंधळेकर यांनी सोमवारी दिली. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना शनिवारी (२० डिसेंबर) या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे हे आदर्श शहर आहे. एक जानेवारीपासून उरुळी देवाची येथील डेपोमध्ये कचरा स्वीकारणे बंद केले तर काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून एक ते तीन दिवसांत काही उत्पादनांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान आम्ही विकसित केले आहे. या इंधनाच्या माध्यमातून बस चालविता येईल का, अशी विचारणा नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर २५ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून ५०० लीटर इंधनाची निर्मिती करण्यामध्ये यश आले आहे, असे गोंधळेकर यांनी सांगितले. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रिकल्चर संस्थेची ‘जनवाणी’ ही संस्था आम्हाला सहकार्य करीत असून, कचरा उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्वच्छ’ संस्थेचे सहकार्य लाभत आहे.
ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधन कांडी (फ्यूएल पिलेट्स बनविल्या जातात. सकाळी ९ वाजता कचरा आल्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत या इंधन कांडय़ा तयार होतात. शहरातील कर्वे स्त्री शिक्षण संस्था, मातोश्री वृद्धाश्रम यांसह काही वसतिगृहे आणि हॉटेल्समध्ये या इंधनाचा वापर करून दररोज सुमारे तीन हजार व्यक्तींचा स्वयंपाक केला जातो. त्यामुळे स्वयंपाकाच्या गॅसवर होणाऱ्या खर्चात मोठय़ा प्रमाणावर बचत झाली आहे, असे या संस्थांनीच सांगितले असल्याची माहिती संतोष गोंधळेकर यांनी दिली.
कचऱ्यापासून इंधनाचा  प्रकल्प गुजरातमध्ये
कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधनाची निर्मिती करण्याचा हा प्रकल्प आता गुजरातमध्येही जात आहे. वडनगर या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत असून, हरिभाई शहा यांनी त्यामध्ये लक्ष घातले असल्याचे संतोष गोंधळेकर यांनी सांगितले.