आज आगमन, पालखी सोहळय़ाची तयारी

पंधराशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन बुधवारी (२९ जून) पुण्यनगरीत होणार आहे. पालखी मार्गावरील संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. घातपात विरोधी पथक आणि बाँबशोधक व नाशक पथकही पालखी मार्गावर तैनात करण्यात येणार आहेत. शहराच्या मध्यभागातील नाना आणि भवानी पेठेत पालख्या मुक्कामी आहेत. तेथे भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पालख्यांचे आगमन बुधवारी शहरात होणार आहे. पालखी मार्गाची पाहणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. घातपाती कारवाया, पालखी मार्गावर उसळणारी गर्दी, वाहतुकीचे नियोजन विचारात घेऊन बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पुणे- मुंबई रस्त्यावर वाकडेवाडी परिसरात दोन्ही पालख्या दुपारी विसाव्यासाठी थांबतात. त्यानंतर तेथून पालख्या शहरात प्रवेश करतात. संचेती चौक, वेधशाळा चौक, गणेशखिंड रस्ता, फग्र्युसन रस्ता, डेक्कन, लक्ष्मी रस्तामार्गे पालख्या मुक्कामी पोहोचतात. गेल्या काही वर्षांपासून पालख्या रात्री मुक्कामी येतात. त्यामुळे रस्त्यावर अतिरिक्त विजेचे दिवे लावून पुरेशी प्रकाशव्यवस्था ठेवण्यात यावी, अशी सूचना पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

पालखी बंदोबस्ताबाबत माहिती देताना परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ म्हणाले की, पालखी मार्गाची पाहणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. संभाव्य घातपाती कारवाया विचारात घेऊन संपूर्ण पालखी मार्गाची बाँबशोधक नाशक पथकाकडून पाहणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील प्रमुख चौकात  निरीक्षण मनोरे (वॉच टॉवर) उभारण्यात येणार आहेत. तसेच, पालखी मार्गावरील इमारतींवर साध्या वेशातील पोलीस लक्ष ठेवून असतील. निरीक्षणासाठी त्यांना दुर्बिण देण्यात आली आहे. त्या माध्यमातून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. पालखी मार्गावर काही ठिकाणी पालख्या थांबतात. तेथे भाविकांची गर्दी उसळते. चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पुणे पोलिसांच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून (कमांड सेंटर) संपूर्ण पालखी सोहळ्यावर पोलिसांची नजर राहणार आहे. पालखी मार्गावर बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी (दूरध्वनी- १००) संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त हिरेमठ यांनी केले आहे.

खिसेकापूंवर पोलिसांची नजर

पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळल्यानंतर खिसे कापून पैसे लंपास केले जातात, तसेच महिलांचे दागिने हिसकाविले जातात. या पाश्र्वभूमीवर चोरटय़ांपासून सावध राहावे, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी केले आहे. पालख्यांसोबत गुन्हे शाखेची चार पथके राहणार आहेत. पालख्या शहरात मुक्कामी आल्यानंतर दहा पोलीस उपायुक्त, पंधरा सहायक पोलीस आयुक्त, ७५ पोलीस निरीक्षक, १७५ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, पंधराशे पोलीस शिपाई असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

असा असेल बंदोबस्त

  • पालखी मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
  • पंधराशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात
  • संशयितांवर नजर ठेवण्यासाठी मनोरे
  • घातपात विरोधी पथकाकडून पालखी मार्गाची पाहणी
  • पालख्या मुक्कामी नाना- भवानी पेठेत बंदोबस्त
  • भाविकांसाठी रांगांची व्यवस्था

वारकऱ्यांसाठी मोफत फोन सुविधा

पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांसाठी विविध संस्था संघटनांबरोबरच अनेक कंपन्यांकडूनही मोफत सेवा उपलब्ध करून दिल्या जात असून व्होडाफोन सुपरनेटतर्फे वारकऱ्यांना मोफत टेलिफोन सेवा तसेच मोबाईल चार्जिग सेवा दिली जात आहे. वारकऱ्यांना टेलिफोन सेवा देण्यासाठी कंपनीने चार खास वाहने तयार केली आहेत. या मोबाईल बस वारीबरोबर आहेत. या प्रत्येक वाहनात आठ फोन असून १०० मोबाईल एकाच वेळी चार्ज करता येतील अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच वेळी ४०० वारकऱ्यांचे मोबाईल चार्ज होऊ शकतील. तसेच मोफत टेलिफोन सेवेचाही लाभ वारकरी घेऊ शकतील. पंढरपूर पर्यंतच्या प्रवासात ही वाहने वारीबरोबर राहणार असून या उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष आहे. या मोबाईल बस उपक्रमाचे उद्घाटन पालखी सोहळा विश्वस्तांच्या उपस्थितीत करण्यात आले. कंपनीचे महाराष्ट्र व गोवा परिमंडळाचे व्यवसाय प्रमुख आशिष चंद्रा यावेळी उपस्थित होते.

साखळीपीर तालीमतर्फे ‘पालखी उत्सव’

पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्यानिमित्त नाना पेठेतील साखळीपीर तालीम मंडळाच्या वतीने पालखी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (२९ जून) पासून (१ जुलै) दरम्यान हा पालखी उत्सव आयोजित करण्यात आला असून या पालखी उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांसाठी योग, प्राणायाम शिबिर, तसेच नाष्टा, भोजन व्यवस्था, वैद्यकीय सेवा, भारुड, भजन आदी सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश या उत्सवामध्ये करण्यात आला आहे. कला तपस्वी रंगभूमी निर्मित ‘सुगंध मराठी मातीचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शाहीर राजेंद्र कांबळे आणि सहकारी यांचा ‘शाहिरी जलसा’ही या निमित्ताने सादर केला जाणार आहे. हे कार्यक्रम गुरुवारी (३० जून) होतील. साखळीपीर तालीम मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी ही माहिती दिली.

‘अभिनव कलाभारती’तर्फे वारकरी सेवा

रंगावलीच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या अभिनव कलाभारती या संस्थेच्या कलाकारांतर्फे वारकरी सेवेचा उपक्रम केला जाणार आहे. नवी पेठेतील श्री विठ्ठल मंदिर आणि सहकारनगर येथील श्री गजानन महाराज मठ या ठिकाणी मुक्कामाला असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांची सेवा रंगावली कलाकार करणार आहेत. दिंडीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची सर्व व्यवस्था करतानाच त्यांचे पाय चेपून त्यांची सेवा करण्यात येणार आहे.

नवी पेठ विठ्ठल मंदिरामध्ये माई गिराम िदडीचे स्वागत

नवी पेठ येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये माई गिराम िदडीचे स्वागत करण्यात आले. या िदडीसमवेत मानाचा अश्व श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान ठेवलेल्या संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये दाखल झाला आहे.  माई गिराम यांनी दीडशे वर्षांपूर्वी रिंगणासाठीचा अश्व देहू येथे नेण्याची परंपरा सुरू केली. ही परंपरा चौथ्या पिढीनेही जोपासली. या दिंडीस माई िदडी असे म्हणतात. हा अश्व पालखी सोहळ्याबरोबर असतो आणि पालखी सोहळ्यातील िरगणामध्ये धावत असतो. ज्येष्ठ शुद्ध द्वादशी ते शुद्ध सप्तमी असा प्रवास करून हा अश्व पंढरपूर येथून िदडीसमवेत निघून देहूला पोहोचतो, अशी माहिती िदडीप्रमुख आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार निवृत्ती नामदेव गिराम यांनी दिली.  येथील विठ्ठल मंदिरामध्ये विश्रांतीसाठी या अश्वाचे आगमन झाले.