सर्व भारतीय प्रादेशिक चित्रपटांचा जनक असलेल्या मराठी चित्रपटाची गेल्या शंभर वर्षांची संपूर्ण सूची असलेल्या ‘शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा- १९१३ ते २०१३’ या सूचीचे प्रकाशन रविवारी (५ जुलै) प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सचिन यांच्या हस्ते होणार आहे.
व्ही. शांताराम फाउंडेशन, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहामध्ये सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, फाउंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम, ‘शांताराम’ चरित्राच्या लेखिका मधुरा जसराज आणि संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम उपस्थित राहणार असून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. याच कार्यक्रमात ‘शांतारामा’ या ध्वनिफितीचे प्रकाशनही होणार आहे. या ध्वनिफितीसाठी दिलीप प्रभावळकर यांनी व्ही. शांताराम यांच्या आत्मचरित्राचे वाचन केले आहे.
‘राजकमल कलामंदिर’ने निर्मिती केलेल्या चित्रपटांच्या मूळप्रती (निगेटिव्ह) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. सारेगमपा कंपनीने शांतारामबापूंच्या चित्रपटांतील लोकप्रिय गीतांची ‘अमर मराठी चित्रगीते’ ही ध्वनिफीत काढली असून त्याचे प्रकाशनही या वेळी होणार आहे. उत्तरार्धात ‘पोट्रेट ऑफ ए पायोनियर : व्ही शांताराम’ हा मधुरा जसराज दिग्दर्शित अनुबोधपट दाखविण्यात येणार आहे. व्ही. शांताराम फाउंडेशनच्या ‘शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा’ या प्रकल्पामध्ये १९१३ ते १९३१ या कालावधीत मराठी दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या ३७२ मूकपटांच्या सूचीसह ‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या चित्रपटापासून ते २०१३ मधील ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटापर्यंतच्या २०० मराठी चित्रपटांचा समावेश आहे. कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपटातील गीतांच्या ओळी अशा विशेष माहितीने ही सूची सजली आहे.