विद्युतीकरणाच्या कामानंतर लोकलची चाचणी
प्रवाशांची मागणी वाढत असलेल्या पुणे- दौंड या पट्टय़ामध्ये लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून आता या मार्गावर लोकल चालविण्याबाबत चाचण्या घेण्यात येणार आहेत. नियोजनानुसार हा प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने जूनमध्ये रेल्वेकडे हस्तांतरित केला जाणार आहे. त्यानंतर या मार्गावर रेल्वे वाहतुकीचा विस्तार केला जाणार असून, प्रत्यक्षात लोकल गाडय़ा धावू शकणार आहेत. त्यामुळे या बहुप्रतीक्षित पुणे- दौंड लोकलसाठी आता केवळ दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पुणे- दौंड या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या मार्गाचे विद्युतीकरण करून लोकल गाडय़ांची सुविधा सुरू करण्याची मागणी सुमारे वीस वर्षांपूर्वी प्रवासी संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानंतर अनेक रेल्वेमंत्री व रेल्वे अर्थसंकल्प गेले, मात्र त्यात ही मागणी सातत्याने डावलण्यात आली होती. सुमारे सात वर्षांपूर्वी हा विषय रेल्वे अर्थसंकल्पात आला, पण निधीच मिळत नसल्याने दोन वर्षे रखडला. निधी उपलब्ध झाल्यामुळे चार वर्षांपूर्वी विद्युतीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवून काम करण्यात येत असल्याने काम वेगात होऊ शकले नाही. सद्य:स्थितीत विद्युतीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे विद्युतीकरण करणाऱ्या यंत्रणेकडून या मार्गावर सध्या विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यात लोकल गाडी चालविण्याच्या चाचणीचाही समावेश आहे.
दौंडपर्यंतच्या पट्टय़ामधून पुण्याकडे रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. विद्यार्थी, कामगार व व्यवसायाच्या निमित्ताने येणाऱ्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. पुणे- दौंड दरम्यानच्या भागात लोकवस्तीही वाढत चालली आहे. पुणे- दौंडसाठी सध्या पॅसेंजर गाडीची सुविधा आहे. मात्र, संध्याकाळी व सकाळच्या वेळेला या गाडय़ांमध्ये अक्षरश: पायही ठेवायला जागा रहात नाही. त्यामुळे वादावादीचे प्रसंगही होतात. या पाश्र्वभूमीवर या मार्गावर लोकलची सेवा उपलब्ध झाल्यास हजारो प्रवाशांना सुविधा मिळण्याबरोबरच रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडू शकणार आहे. सध्या पुणे विभागात रेल्वेची पुणे- लोणावळा लोकल सेवा सुरू आहे. दौंडपर्यंत विद्युतीकरण झाल्यामुळे पुणे- दौंडबरोबरच थेट लोणावळा-पुणे- दौंड अशी लोकल सेवाही सुरू होऊ शकणार असून, त्यामुळे लोणावळा, मावळ, पिंपरी- चिंचवड हे विभाग रेल्वेने थेट दौंड भागाशी जोडले जाऊ शकतील.

‘‘पुणे- दौंड मार्गाचे विद्युतीकरण करणाऱ्या यंत्रणेकडून विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. अद्यप हा प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने रेल्वेकडे हस्तांतरित झालेला नाही. जूनपर्यंत तो हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या मार्गावर लोकल किंवा इतर सुविधा देण्याबाबत नियोजन करण्यात येईल.’’
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे