निगडी-प्राधिकरणातील १९ एकर विस्तृत स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर शिवसेनेचे नगरसेवक बाबासाहेब धुमाळ यांच्या पुढाकाराने दहा दिवस ‘दांडिया’चे आयोजन केले असून त्यास राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक राजू मिसाळ यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यावरून प्रतिष्ठेचा मुद्दा करत दोहोंमध्ये चांगलीच जुंपली असून प्रकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचले आहे. नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश अजितदादांनी आयुक्तांना दिले. तथापि, आयुक्तांनी ठोस निर्णय न घेतल्याने हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.
नगरसेवक धुमाळांचे निवासस्थान प्राधिकरणात असून त्यांचा मुलगा व मित्र परिवाराने सावरकर उद्यानाच्या (गणेश तलाव) प्रवेशद्वारासमोर ‘दांडिया’चे आयोजन केले आहे. त्यासाठी आवश्यक परवानगी पालिकेकडून घेतल्याचे धुमाळांचे म्हणणे आहे. तर, स्थानिक रहिवाशांना त्रास होत असून उद्यानात अशाप्रकारच्या कार्यक्रमांची परंपरा पडू नये, असा मुद्दा उपस्थित करून मिसाळांनी त्यास विरोध केला असून आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. या मुद्दय़ावरून दोहोंमध्ये जुंपली असून दोन्हीकडील दबावामुळे प्रशासनाचे ‘सँडविच’ झाले आहे. हा वाद अजितदादांपर्यंत गेल्यानंतर नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश अजितदादांनी आयुक्तांना दिले. तेव्हा दिलेली परवानगी आयुक्तांनी रद्द केली. मात्र, तरीही दांडियाचे नियोजन सुरूच असल्याची तक्रार मिसाळांनी पुन्हा केली आहे. गुरूवारी नवरात्र उत्सवास सुरूवात होत असताना  हा वाद टोकाला गेला असून तो आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात, मिसाळांनी पत्रकारांना सांगितले,की स्थानिक रहिवाशांचा दांडियाला विरोध आहे. दहा दिवस नागरिकांना त्याचा त्रासच होणार आहे. उद्यानात दांडिया होऊ लागल्यास यापुढे लग्न, स्वागत समारंभांचे कार्यक्रमही सुरू होतील. धुमाळ यांनी सांगितले की, दांडियाची जागा उद्यानात नसून वाहनतळाची आहे, त्यासाठी परवानगी घेतलेली आहे. जनतेसाठीचा सुंदर कार्यक्रम असतानाही मिसाळ विनाकारण विरोध करत आहेत.