उद्यापासून सोनोग्राफी बेमुदत बंद

खासगी रेडिओलॉजी केंद्रांत केल्या जाणाऱ्या सोनोग्राफीसह एक्स रे, सीटी स्कॅन, एमआरआय या चाचण्यांच्या सेवा गुरुवारी बंद ठेवल्या जाणार आहेत. गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यातील बदलांच्या मागणीसाठी ‘इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन’ (आयआरआयए) या संघटनेने देशव्यापी संप पुकारला असून शुक्रवारपासून केवळ सोनोग्राफी सेवा बेमुदत ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

तातडीच्या चाचण्यांची गरज असलेल्या रुग्णांना संपकाळात रुग्णालयांमध्ये सेवा मिळेल, असे संघटनेने स्पष्ट केले. ‘सोनोग्राफीसाठी आलेल्या गर्भवतींच्या नोंदी ठेवण्यातील चुका व प्रत्यक्ष गर्भलिंगनिदान याला समान ठरवले जाऊ नये. या कायद्यातील ‘एफ फॉर्म’वरील एखादा रकाना न भरणे, डॉक्टरची सही विसरणे अशा गोष्टींसाठी फौजदारी गुन्हे दाखल होऊ नयेत,’ अशा विविध मागण्या संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केल्या आहे.

देशात या संघटनेचे अंदाजे २० हजार रेडिओलॉजिस्ट आहेत, तर पुण्यात त्यांची संख्या ५५० आहे. शहरातील मोठय़ा रुग्णालयांच्या संघटनेनेही गुरुवारी एक दिवस सोनोग्राफी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ या डॉक्टरांच्या संघटनेसह ‘फॉग्सी’ या स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनेनेही संपाला पाठिंबा दिला असल्याची माहिती ‘आयआरआयए’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. गुरुराज लच्छन यांनी दिली.

काही रुग्णालयांचा मात्र संपास पाठिंबा असूनही त्यांनी चाचण्या बंद न ठेवण्याचे ठरवले आहे. दीनानाथ रुग्णालयाचा या संपास पाठिंबा आहे, परंतु रुग्णालयात चाचण्या सुरू राहतील, अशी माहिती ‘दीनानाथ’चे संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी दिली.

स्त्रीरोगतज्ज्ञ सोनोग्राफी बंद ठेवणार

‘पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकोलॉजी सोसायटी’चे सचिव डॉ. पंकज सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनोग्राफी करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञांनीही ‘रुटीन’ सोनोग्राफी चाचण्या बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी माता व बालकांच्या जीवावर बेतणार नाही, याची काळजी डॉक्टरांकडून घेतली जाईल, असेही डॉ. सरोदे म्हणाले.