गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यास प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी मुहूर्त मिळाला. बऱ्याच नाटय़मय घडामोडींनंतर ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे खास विश्वासू सदाशिव खाडे यांची वर्णी लागली आहे. खाडेच अध्यक्षपदी नियुक्त होणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ ने यापूर्वीच प्रसिध्द केले होते. पुण्यात अनिल शिरोळे यांच्या पाठोपाठ पिंपरीतही मुंडे समर्थकाची निवड झाल्याने मुंडे यांचा वरचष्मा सिध्द झाला.
मावळते शहराध्यक्ष एकनाथ पवार यांची तीन वर्षांची मुदत संपली. मात्र, तेव्हापासून याबाबतचा निर्णय प्रलंबित होता. कोणत्याही एका नावावर एकमत होत नसल्याने वर्षभरापासून घोळ सुरू होता. अनेकांची नावे चर्चेत आली अन् गेली. बाळासाहेब गव्हाणे शेवटपर्यंत स्पर्धेत राहिले. खाडे-गव्हाणे यांच्यापैकी एक नाव देण्याची सूचना मुंडे यांनी केली. मात्र, तसे होऊ शकले नाही. अखेर, मुंडेंशी असलेली ‘जास्तीची’ जवळीक खाडेंना फायदेशीर पडली. बुधवारी दुपारी प्रदेशाध्यक्षांचा खाडेंच्या नियुक्तीचा आदेश प्राप्त झाला आणि पक्षात संमिश्र प्रतिक्रिया उमटली. मुंडे समर्थकांनी जल्लोष केला. तर, एकनाथ पवार व त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. मुंडे गटाच्या गव्हाणे तसेच काही प्रमुख कार्यकर्त्यांनाही हा निर्णय पसंत पडला नाही.
खाडे केवळ ‘बोलबच्चन’ आहेत. बलाढय़ राष्ट्रवादीशी दोन हात करण्याची धमक त्यांच्यात नाही. केवळ नेत्यांची चापलुसी आणि खबरेगिरी करून आतापर्यंत त्यांनी पदे मिळवली आहेत, आता पक्षाचे काही खरे नाही, अशा प्रतिक्रिया नाराज कार्यकर्त्यांनी पत्रकारांना दूरध्वनी करून व्यक्त केल्या. अनेकांचा तीव्र विरोध असतानाही खाडे यांची निवड होणार, हे उघडपणे दिसत होते. मात्र, ती कोणालाही रोखता आली नाही, यातच सर्वकाही आले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खाडे यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळाली आहे. ‘कर्तृत्वशून्य’ ही टीका खाडे यांना कृतीतून खोडावी लागणार असून आगामी काळात
कर्तृत्व सिध्द करावे लागणार आहे.
पद एक, फिल्डिंग अनेकांची!
शहराध्यक्षपदासाठी होणाऱ्या नाटय़मय घडामोडींचे केंद्र पिंपरीसह पुणे, मुंबई, परळी, नागपूर अशा विविध ठिकाणी होते. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुनील कर्जतकर अशा नेत्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यात सहभाग येत होता. अखेर, सदाशिव खाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने मुंडे यांची सरशी झाली.

Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट