शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर हे बुधवारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी गजानन बाबर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आझम पानसरे यांच्यापाठोपाठ आणखी एका ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची ताकद वाढली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात एके काळी गजानन बाबर हे नाव केंद्रस्थानी असायचे. पिंपरी पालिकेचे तीन वेळा नगरसेवक, विरोधी पक्षनेता, दोन वेळा आमदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, मावळ लोकसभेचे पहिला खासदार आणि सातारच्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशी भली मोठी राजकीय कारकीर्द असलेले बाबर सद्य:स्थितीत सक्रिय राजकारणात नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन शिवसेनेत दाखल झालेल्या बाबरांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेची पहिली शाखा काळभोरनगर येथे सुरू झाली. काळभोरांच्या प्रभावक्षेत्रात बाबरांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. काळभोरांच्या अंतर्गत वादाचा फायदा घेत ते निवडून आले होते.

बाबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असताना मावळ लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली. राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांचा पराभव करून ते खासदारही झाले होते. शिवसेनेने बाबरांना उमेदवारी न देता श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली. उमेदवारी देण्याचा शब्द देऊनही पत्ता कापण्यात आल्याने संतापलेल्या बाबर यांनी थेट मनसेच्या गोटात प्रवेश केला होता.  बाबर यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले आझम पानसरे ‘पवार प्रेम’ बाजूला ठेवून भाजपमध्ये दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ बाबरही भाजपत दाखल झाल्याने पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.