‘पुतळ्यांचे संग्रहालय करावे..’ असे मत कलाकारांकडूनच व्यक्त होत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठय़ा प्रमाणावर पुतळे उभारले जात आहेत. पुतळ्यांची संख्या वाढत असताना या पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी विद्यापीठ खरोखरच सक्षम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यापीठाच्या आवारात पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. समता परिषदेकडून विद्यापीठाला देण्यात आलेला महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळाही आहे. आंबेडकर अध्यासनामध्ये डॉ. आंबेडकरांचा अर्धपुतळा आणि समता परिषदेनेच नव्याने दिलेला डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे. छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा तयार झाला असून विद्यापीठाच्या आवारात लवकरच तोही बसवण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले, छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळे उभे करण्याचे प्रस्ताव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर मांडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बसवेश्वर, डॉ. जयकर यांचेही पुतळे विद्यापीठाच्या आवारात उभे करण्यात यावेत, असे प्रस्ताव अधिसभेसमोरही यापूर्वी आले आहेत. या पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी आणि काळजी घेण्यासाठी विद्यापीठ सक्षम आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
विद्यापीठाचा परिसर ४११ एकर आहे. राष्ट्रीय महत्त्व असलेल्या संस्था, काही धार्मिक स्थळेही या परिसरात आहेत. या सगळ्याच्या सुरक्षेसाठी सध्या विद्यापीठाकडे साधारण ८५ सुरक्षा रक्षक आहेत, जे तीन पाळ्यांमध्ये विभागले जातात. विद्यापीठात उभारण्यात आलेल्या पुतळ्यांच्या आडून अनेक सामाजिक, राजकीय संघटनांनी विद्यापीठात शिरकाव केला आहे. पुतळ्यांचा  अनावरण समारंभही आक्षेप, वादविवाद यापासून दूर राहिलेला नाही. त्या पाश्र्वभूमीवर या पुतळ्यांची सुरक्षा हा विषय अधिक गंभीर बनला असल्याचे मत व्यक्त होत आहे. पुतळे आणि स्मारके यांची सुरक्षा आणि काळजी घेणे जीकिरीचे असल्यामुळे विद्यापीठाच्या आवारात पुतळे आणि स्मारके उभारू नयेत असा निर्णय पूर्वी व्यवस्थापन परिषदेने घेतला होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी हा निर्णय व्यवस्थापन परिषदेने मागे घेतला. त्यानंतर समता परिषदेच्या आग्रहाने महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्यात आला. आता पुतळे उभारण्याचे अनेक प्रस्ताव विद्यापीठाकडे आले आहेत. पुतळ्यांसाठी पूर्ण सुरक्षा ठेवली, तर बाकीच्या परिसराच्या सुरक्षेसाठी मनुष्यबळ पुरत नाही आणि पुतळ्यांना दिलेले संरक्षण काढता येत नाही, अशा पेचात विद्यापीठ प्रशासन अडकले आहे.
 
‘‘विद्यापीठाच्या आवारातील पुतळ्यांच्या सुरक्षेची प्रशासनाकडून पूर्णपणे काळजी घेण्यात येते. विद्यापीठात सुरक्षा रक्षकांमध्ये ३० रक्षक विद्यापीठाचे कर्मचारी आहेत. ३० मेस्को या संस्थेकडून घेण्यात आले आहेत आणि २५ रोजंदारीवर आहेत. सध्या विद्यापीठात असलेल्या चारही पुतळ्यांजवळ २४ तास एक सुरक्षा रक्षक असतो. सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. मेस्कोकडे आणखी ३० रक्षकांची मागणी केली आहे. अजून एक सिक्युरिटी एजन्सी निवडण्यासाठी टेंडरची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्या संस्थेकडून १५० सुरक्षा रक्षक मिळण्याची अपेक्षा आहे. ’’
– डॉ. नरेंद्र कडू, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ