आमदार देवेंद्र फडणवीसांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बऱ्याच काळापासून विस्कटलेली प्रदेश पातळीवरची घडी व्यवस्थित होत असताना गटबाजीच्या राजकारणातून पुरती वाट लागलेल्या पिंपरी-चिंचवड भाजपचे ‘भिजते घोंगडे’ कायम आहे. बऱ्याच काळापासून रखडलेली शहराध्यक्षपदाची निवड निर्णायक टप्प्यात आली आहे. मात्र, कोणत्याही नावावर एकमत होत नसल्याने आणि इच्छुकांनी तगादा लावल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
शहराध्यक्ष एकनाथ पवार यांची मुदत संपली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटत नसल्याने त्यांना अघोषित मुदतवाढ मिळाली होती. प्रदेश पातळीवर सर्वकाही स्थिरसावर झाल्यानंतर िपपरीतील शहराध्यक्षपदाची प्रक्रिया सुरू झाली. पडद्यामागे बऱ्याच नाटय़मय घडामोडी झाल्या व आता निर्णयाची वेळ आली आहे. पवार शहराध्यक्षपदासाठी पुन्हा इच्छुक असून त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. आपले नाव डावलले गेल्यास नामदेव ढाके यांचा पर्यायही ठेवला आहे. ‘पदवीधर’ आमदार होण्याची संधी डावललेले अॅड. सचिन पटवर्धन यांना आपल्याला आता न्याय मिळेल, याची खात्री आहे. खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या गटातील बाळासाहेब गव्हाणे, सदाशिख खाडे यांच्यातच चढाओढ आहे. मागील वेळी मुंडे गटाचा शहराध्यक्ष होण्याची संधी आपापसातील हेवेदाव्यांमुळे हातातून निसटली होती. सहाजण गुडग्याला बािशग बांधून होते. कोणीच माघार घ्यायला तयार नव्हते. एकमत नसल्याने मुंडे गटाकडील एकालाही संधी मिळाली नाही आणि सर्वाधिक विरोध असतानाही पवार शहराध्यक्ष झाले.
मुंडे गटाने त्यातून काहीही धडा न घेतल्याने तीच परिस्थिती आताही आहे. गव्हाणे व खाडे यांच्यापैकी माघारीच्या मनस्थितीत कोणीही नाही. दोन तट पडल्याने मुंडे यांच्यासमोर हा विषय गेला. एकच नाव सांगा, पुढचे मी पाहतो, असे फर्मान त्यांनी सोडले. निर्णयासाठी चिंचवडला मुंडे गटातील प्रमुखांची बैठक झाली. बराच काथ्याकूट करूनही एकमत झाले नाही म्हणून गव्हाणे, खाडे अशी दोन्हीही नावे देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे शहराध्यक्ष निवडीबाबत ‘पहिले पाढे पंचावन्न’ असेच चित्र आहे. अंतिम निर्णय फडणवीस घेणार असले तरी त्यांना मुंडे, नितीन गडकरी, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे. त्यामुळे कोणाची सरशी होईल, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

भाजपची चावी राष्ट्रवादीच्या हातात
लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकांच्या काळात भाजपला राष्ट्रवादीशीच लढायचे आहे. पिंपरीत राष्ट्रवादीकडे तगडय़ा नेत्यांची फौज आहे तर भाजपमध्ये सर्वमान्य नेतृत्वच नाही. कायकर्ते कमी स्वयंघोषित नेत्यांची संख्या जास्त आहे. राष्ट्रवादी नेत्यांशी साटेलोटे करणे व त्यांच्या तालावर नाचणे हा भाजप नेत्यांचा जुना खेळ आहे. आतापर्यंतच्या प्रवासात भाजपची चावी राष्ट्रवादीकडेच राहिल्याचे पक्षातूनच सांगितले जाते. ‘टीम देवेंद्र’ मध्ये त्यात सुधारणा होईल का, असा मुद्दा कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातो.