पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक नेते, पदाधिकारी, नगरसेवक तसेच अधिकारी वेगवेगळ्या कारणांनी, प्रशिक्षण-अभ्यास दौरे अशा गोंडस नावाखाली परदेशात जाऊन आले. अशा दौऱ्यांवर सातत्याने टीका झाली. मात्र, कोणालाही फरक पडत नाही. नागरिकांच्या दृष्टीने काहीच उपयोग होत नसतानाही दौऱ्यांचे सत्र व त्यातून होणारी उधळपट्टी सुरूच आहे. ‘उदंड झाले दौरे, उपयोग शून्य’ अशी दौऱ्यांची स्थिती आहे.
महापौरांचा महिला नगरसेविकांचा महाबळेश्वर दौरा, पक्षनेते, उपमहापौरांचा बहुचर्चित अमेरिका दौरा तर अधिकाऱ्यांचा गोपनीय परदेश दौरा एकाच कालाधीत झाल्याने अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यांचा व त्याच्या उपयुक्ततेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यातील महिला लोकप्रतिनिधींसाठी महाबळेश्वरला झालेल्या दोन दिवसांच्या विशेष प्रशिक्षणासाठी िपपरी-चिंचवडच्या ३० नगरसेविका सहभागी झाल्या. ७४ वी घटनादुरुस्ती, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महत्त्वपूर्ण कायदे, सभाशास्त्र, नागरिकीकरण, शहरांना भेडसावणाऱ्या समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, सेवा व्यवस्थापन, लोकप्रतिनिधी-प्रशासनातील समन्वय आदी विषयाचे प्रशिक्षण मिळणार होते. प्रत्यक्षात दौऱ्यात काय झाले, या विषयी ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे मोजक्या पदाधिकाऱ्यांचा अमेरिका दौराही बराच चर्चेत आहे. उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे, काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पक्षनेते मंगला कदम व काही नगरसेवकांचा समावेश असलेल्या अमेरिका दौऱ्याविषयी गोपनीयता पाळण्यात आली. कोणी आमंत्रित केले, खर्च कोण करणार, नेमके हेच पदाधिकारी कोणी निवडले, अशा अनेक गोष्टींची उत्तरे मिळत नाहीत. नगरसेवक दौऱ्यांच्या बाबतीत आघाडीवर असताना अधिकारी मागे कसे राहतील.
त्यांनीही गटागटाने परदेशवारी करून आपली दौस भागवून घेतली आहे. नुकतेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक गट गुप्तपणे परदेशात गेला आहे, त्याचीही कोणाला माहिती नाही. आतापर्यंतच्या परदेश दौऱ्यांचा आढावा घेतल्यास त्यातून शहरवासीयांच्या पदरात काही पडले, असे दिसत नाही. पालिकेच्या पैशाची नाहक उधळपट्टी करणारी ही मंडळी अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली ‘जीवाची मुंबई’ करून येतात. कधी ठेकेदार प्रायोजकत्व स्वीकारतात. कधी स्वत:च्या खर्चाने गेलो, असे सांगून नंतर खर्चाचे प्रस्ताव दाखल करतात. अशा दौऱ्यांना चाप लावण्याची मागणी वेळोवेळी होत असली तरी संगनमताने दौऱ्यांचे सत्र कायम आहे.