चलनतुटवडय़ामुळे गुलटेकडीतील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात होणारी भाजीपाल्याची आवक कमी होत चालली आहे. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत मार्केट यार्डात फक्त तीस ते चाळीस टक्के भाजीपाल्याची आवक झाली आहे. बहुतांश भाजीपाल्यांचे दरही उतरले आहेत.

[jwplayer r33reeos]

गुलटेकडीतील भाजीपाला बाजारात एरवी दर रविवारी भाजीपाल्याची ९० ते १०० गाडय़ांची आवक होत असते. मात्र, रविवारी (२० नोव्हेंबर) ६० ते ७० गाडय़ांमधून भाजीपाल्याची आवक झाली.

आठवडय़ानंतरही भाजीपाला बाजारात किंबहुना संपूर्ण मार्केट यार्डाच्या परिसरात परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. भाजीपाल्याची आवक तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी झाली आहे. शेतकऱ्यांना देण्यास पैसे नसल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतीमाल विक्रीस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजार आवाराकडे पाठ फि रवली आहे, अशी माहिती गुलटेकडी मार्केट यार्डातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी दिली.

केंद्र सरकारच्या अर्थ विभागाकडून जिल्हा बँकांवर काही बंधने घालण्यात आली आहेत. जिल्हा बँकेकडे नवीन चलन उपलब्ध नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे खाते जिल्हा बँकेत आहे. शेतकरी धनादेश स्वीकारण्यासदेखील तयार नाहीत. काही शेतकरी शेतीमालाचे निम्मे पैसे स्वीकारत आहेत, असे त्यांनी सांगितले.

खरेदीदारांकडून जुन्या नोटा स्वीकारणार

सरकारने दररोज पन्नास हजार रुपयांचा भरणा बँकेत स्वीकारणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे खरेदीदारांकडून जुन्या नोटा स्वीकारणार आहोत. या नोटांचा भरणा बँकेत करण्यात येणार आहे. तोपर्यंत पाचशे रुपयांच्या नवीन नोटा उपलब्ध होतील. त्यामुळे बाजार आवारातील व्यवहार सुरळीत होतील, असे मार्केट यार्डातील विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

[jwplayer VwmkQGEJ]