नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षात येताना कोणतीही अट घातलेली नाही किंवा ‘डिल’ही केलेली नसल्याचे स्पष्ट करत सिद्धूंचे वडील हे काँग्रेसमध्ये होते. आणि आता त्यांची घरवापसी झाल्याचे काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले. आज (मंगळवार) पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत खुलासा केला. सिद्धू यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा सध्या पंजाबमधील राजकारणात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी माध्यमांना याची माहिती दिली.

ही आपली अखेरची निवडणूक असून बादल यांना त्यांच्याच मतदारसंघात आम्ही पराभूत करू असे म्हटले. शिरोमणी अकाली दलाकडून जनरल जे. जे. सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत अमरिंदर सिंग म्हणाले, जे. जे. सिंग हे मला कनिष्ठ आहेत. ते अत्यंत निष्प्रभ आणि सामान्य दर्जाचे असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.
सियाल पाणी वाटप कराराबाबतही त्यांनी भाष्य केले. माझ्या पंजाबच्या हक्काचे एक थेंबही पाणी कोणाला देणार नसल्याचे त्यांनी या वेळी ठणकावून सांगितले. सिद्धू यांचे वडील हे काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे सिद्धू यांच्यावर काँग्रेसचा पूर्वीपासूनच प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये येताना कोणतीही अट घातली नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून अशा प्रकारच्या चर्चेला पुर्नविराम देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसमध्ये सिंद्धूचे परतणे म्हणजे त्यांची घरवापसी असल्याचे ते म्हणाले.
सिद्धू यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तत्पूर्वी ते आम आदमी पक्षात जातील अशी मोठी चर्चा सुरू होती. परंतु तब्बल दोन ते तीन महिने चर्चा मसलत करून सिद्धूंनी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सिद्धू यांनी भाजपबरोबर शिरोमणी अकाली दलावर गंभीर आरोप केले होते. हे आरोप अकाली दलाला चांगल्याच जिव्हारी लागल्याचेही दिसून आले. सिद्धू यांनी पत्रकार परिषदेत ही आपली घरवापसी असल्याचे म्हटले होते. पंजाबमध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपद मिळावे ही सिद्धू यांची महत्वकांक्षा लपून राहिलेली नाही.