कवी वा लेखकाचे वेगळेपण त्याने हाताळलेल्या विषयांच्या वैविध्यतेत असते. हे वैविध्य फार महत्त्वाचे. त्याअभावी लेखक वा कवी स्वत:भोवती बांधलेल्या चौकटीत अडकून जातो. मग त्याच्या लिखाणात दिसते ते तेच ते नि तेच ते. जी काही चार तुटपुंज्या अनुभवांची शिदोरी त्याच्याकडे जमा होते, तो मग तिच्यातच घुटमळताना दिसतो. तसे झाले की आपण म्हणतो- त्या लेखकाकडे काही खोली नाही वा तो पुनरुक्तीच करतो.

अशा तऱ्हेने वैविध्य हा निकष लावावयाचा झाल्यास समर्थ रामदास अत्यंत थोरच ठरतात. त्यांनी एका जन्मात जे लेखनविषय हाताळले ते अनेकांना अनेक जन्मांत मिळूनही हाताळता येणार नाहीत. अध्यात्म, राज्यशास्त्र, आधिभौतिकाचे गुणधर्म, माया, विवेकाचे महत्त्व, मनोव्यापार, मनाचे श्लोक, करुणाष्टके असे किती म्हणून रामदासांनी हाताळलेले विषय सांगावेत. त्याचप्रमाणे त्यांच्या वाङ्मयाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे विविध विषयांचे त्यांना असलेले औत्सुक्य. आपला अनुभव असा की, संत वगरे म्हणवून घेणारे हे एकसुरे असतात. त्यातही जगण्याच्या आनंदविषयांचे त्यांना अगदीच वावडे असते. शिवाय, त्यांची दुसरी एक समस्या म्हणजे तसा आनंद घेणाऱ्यांना ते कमीही लेखतात. या मर्त्य देहाचे चोचले पुरविण्यात काय हशील, असा किंवा तत्सम असा त्यांचा सूर असतो.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

रामदासांचे तसे नाही. अक्षर कसे काढावे, वीट कशी भाजावी, राजकारण कसे करावे येथपासून ते उत्तम सुग्रास भोजन यापर्यंत रामदासांना काहीही अस्पर्श नाही. खाणे, भोजन, अन्न यांस व्यक्तीने आयुष्यात अतिरिक्त महत्त्व देऊ नये असे ते सांगतात. पण म्हणून त्यांच्याकडे पाहूच नये असे त्यांचे म्हणणे नाही. जेवढा काही वाटा या विषयांचा आयुष्यात आहे तो देताना प्रेमाने, आनंदाने द्यावा, इतकेच त्यांचे म्हणणे. त्याचमुळे ते हे असे स्वयंपाक, खाणे या विषयावरचे श्लोकदेखील रचू शकतात..

‘आता ऐका स्वयंपाकिणी

बहुत नेटक्या सुगरणी

अचुक जयांची करणी

नेमस्त दीक्षा’

असे म्हणून समर्थ सुगरणींना हाक देतात. हा देह मर्त्य आहे, त्याच्याकडे लक्षच कशाला द्या, वगरे अशी मानसिकता त्यांची नसल्यामुळे आपल्या क्षुधाशांतीस मदत करणाऱ्या या पाककलानिपुण महिलांविषयी- म्हणजे त्यांच्या पाककलाकौशल्याविषयी त्यांच्या मनात नितांत आदरच आहे. त्यांच्या स्वयंपाककलेचे मोल त्याचमुळे त्यांना समजते आणि ते आपल्यासारख्या वाचकांनाही समजावून देतात.

‘गोड स्वादिष्ट रूचिकर। येकाहून येक तत्पर’

अशी पदार्थाची महती ते सांगतात. आणि हे पदार्थ तरी कोणते?

‘लोणची रायती वळकुटे। वडे पापडे मेतकुटे

मिरकुटे बोरकुटे डांगरकुटे। करसांडगे मीर घाटे॥

नाना प्रकारीच्या काचऱ्या। सांडय़ा कुरवडय़ा उसऱ्या

कुसिंबिरीच्या सामग्य्रा। नाना जीनसी’

तसे पाहू जाता समर्थ हे संन्यासी. परंतु म्हणून जगण्यावर त्यांचे प्रेम नाही असे नाही.

‘कुहिऱ्या बेले माईनमुळे। भोकरे नेपति सालफळे

कळके काकडी सेवगमुळे। सेंदण्या वांगी गाजरे॥

मेथी चाकवत पोकळा। माठ सेउप बसळा

चळी चवळा वेळी वेळा। चीवळ घोळी चीमकुरा’

इतके भाज्यांचे प्रकार अलीकडच्या गृहिणींसही ठाऊक नसतील. रामदास हे असे चहुअंगाने जगण्यास भिडतात. खाद्यपदार्थाचे वर्णन करण्यात काही कमीपणा आहे असे त्यांना जराही वाटत नाही. उदाहरणार्थ या काही रचना..

‘बारीक तांदूळ परिमाळीक।

नाना जीनसीचे अनेक

गूळ साकर राबपाक।

तुपतेल मदराब॥

हिंगजिरे मिरे सुंठी।

कोथिंबिरी आवळकंठी॥

पिकली निंबे सदटी।

मेथ्या मोहऱ्या हरद्री॥

फेण्या फुग्या गुळवऱ्या वडे।

घारिगे गुळवे दहीवडे।

लाडू तीळवे मुगवडे।

कोडवडी अतळसे॥’

किंवा-

‘सुंठी भाजली हिंग तळीला।

कोथिंबीर वाटून गोळा केला।

दधी तक्री कालवला।

लवणे सहित’

‘भरीत’ या पदार्थाचे वर्णन काय बहारदार आहे. पाकसिद्धी ही काही कमी मानावी अशी गोष्ट नाही, हे रामदास जाणतात. संपूर्णपणे भिन्न गुणधर्माच्या पदार्थातून या गृहिणी असे काही चविष्ट पदार्थ तयार करतात, की थक्कच व्हावे. या पदार्थाना गंध आहे. त्यांचा स्वाद घेण्याआधी त्या गंधाने आत्मा तृप्त होऊ लागतो. हे पदार्थ दिसायला आकर्षक आहेत. त्यांच्या स्पर्शाने वेगळा आनंद मिळतो. आणि अंतिमत: त्यांचा स्वाद. सगळेच कौतुक करावे असे. रामदासांच्या शब्दांत..

‘सुवासेचि निवती प्राण। तृप्त चक्षु आणि घ्राण।

कोठून आणले गोडपण। काही कळेना..॥’

आता इतके चवीने खाल्ले म्हणून नंतर व्हा जरा आडवे, असे रामदास म्हणत नाहीत. जेवण करायचे ते आपले इहित कर्तव्य करण्यासाठी आपणास शक्ती असावी म्हणून. पण जे करावयाचे ते चवीने, असे त्यांचे म्हणणे. म्हणून असे चवीने जेवण झाल्यावर रामदास काय म्हणतात पाहा-

‘येथासाहित्य फळाल केले। चुळभरू विडे घेतले।

पुन्हा मागुते प्रवर्तले। कार्यभागासी॥’

असे सुग्रास जेवून चूळ भरावी, विडा घ्यावा. पण नंतर पसरू नये. आपापल्या कार्यभागास लागावे, असा त्यांचा सल्ला. परंतु आपला अनुभव असा की, यातील पहिल्या सल्ल्याची अंमलबजावणी करणे अगदीच सोपे. परंतु त्यानंतर दुसऱ्या भागात सांगितल्यानुसार कार्यास लागणे अंमळ कठीणच. ती शिंची वामकुक्षी आडवी येते आपल्याबाबत. असो. सर्व रसांविषयी समर्थाचे असेच मत आहे.

‘देव वासाचा भोक्ता। सुवासेची होये तृप्तता

येरवी त्या समर्था। काय द्यावे॥’

परमेश्वरालासुद्धा सुगंध आवडतो. तेव्हा अत्तर वगरे लावण्यात काहीही गर नाही. आणि उगाच गचाळ राहण्यात काय अर्थ आहे?

रामदासांचे हे खाद्यपदार्थ वा भोजनप्रेम हे काही फक्त रांधून सिद्ध होणाऱ्या पदार्थाविषयीच आहे असे नाही. त्यांना फळांचेही- त्यातही आंबा या फळराजाचे विशेष अप्रूप आहे. सध्या सुरू असलेला वैशाख मास म्हणजे आंब्यांचा मोसम. तप्त उन्हाशी स्पर्धा करू पाहणारा आंब्यांचा तो तेजस्वी रंग या महिन्यात मोहवून टाकतो. या आंब्याविषयी रामदास लिहितात-

‘ऐका ऐका थांबा थांबा। कोण फळ म्हणविले बा।

सकळ फळांमध्ये आंबा। मोठे फळ॥

त्याचा स्वाद अनुमानेना। रंग रूप हे कळेना।

भूमंडळी आंबे नाना। नाना ठायी॥’

इतके म्हणून रामदास आंब्यांचे प्रकार सांगतात-

‘आंबे एकरंगी दुरंगी। पाहो जाता नाना रंगी।

अंतरंगी बारंगी । वेगळाले॥

आंबे वाटोळे लांबोळे। चापट कळकुंबे सरळे।

भरीव नवनीताचे गोळे। ऐसे मउ॥

आंबे वाकडेतिकडे। खर्बड नाकाडे लंगडे।

केळे कुहिरे तुरजे इडे। बाह्यकार॥

नाना वर्ण नाना स्वाद। नाना स्वादांमधे भेद।

नाना सुवासे आनंद। होत आहे॥’

हे त्यांचे निरीक्षणदेखील आंब्याइतकेच रसाळ. पुढे जाऊन ते आमरसाचेही वर्णन करतात. त्यांच्या मते-

‘एक आंबा वाटी भरे। नुस्ते रसामध्ये गरे।

आता श्रमचि उतरे। संसारीचा॥’

अशा तऱ्हेने आमरसाच्या एका वाटीने संसारीचा श्रम कसा उतरतो याचा अनुभव आणि आनंद आपल्यापकी अनेकांनी घेतला असेल. म्हणून रामदास म्हणतात त्याप्रमाणे-

‘आंबे लावावे लाटावे। आंबे वाटावे लुटावे।

आंबे वाटिता सुटावे। कोणातरी’

असा आंबे वाटणारा कोणीतरी आपणास मिळो आणि आपल्यालाही ते इतरांना वाटण्याची प्रेरणा मिळो, या शुभेच्छांसह इत्यलम्.

समर्थ साधक –  samarthsadhak@gmail.com