बाहेर मस्त  पाऊस पडत असताना तो बघत खिडकीत बसून गरमागरम वाफाळता चहा प्यावा, असं अनेकांना वाटतं. वातावरणातील विशेषत्वामुळे पेयांना या ऋतूमध्ये खूपच महत्त्व आहे. ही सर्व पेयं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तसेच मन, चित्तवृत्ती प्रसन्न ठेवण्यास मदत करतात.

चहा – या ऋ तूमधील सर्वात जास्त प्राशन केले जाणारे पेय. फक्त ऋ तूनुसार त्यात बदल करावा. साधा चहा घेण्यापेक्षा आले, तुळस, सुंठ, गवती चहा, दालचिनी इत्यादी पदार्थ आवडीनिवडीनुसार टाकू शकतो. यामुळे फक्तचव वाढते असे नाही तर या ऋ तूमध्ये वारंवार होणारा जंतुसंसर्ग, सर्दी खोकल्याचा त्रास, कमी प्रमाणात होतो किंवा होतच नाही. या पदार्थामध्ये जी विशिष्ट द्रव्ये असतात, ती बऱ्याच व्याधींपासून आपला बचाव करतात. घशात होणारी वेदना, खवखव नक्की कमी होते.

कॉफी –  चहाप्रमाणेच बऱ्याच प्रमाणात घेतले जाणारे पेय. चहाप्रमाणे तुळस, गवती चहा आदी कदाचित कॉफीमध्ये घालू शकत नाही. पण आवडीप्रमाणे घालू शकतो.

औषधी चहा (हर्बल टी) – नेहमीप्रमाणे साखर, चहा पावडर उकळून जो चहा केला जातो त्याहीपेक्षा हा औषधी चहा अतिशय उपयुक्त आहे. त्यात आले, तुळस, सुंठ, गवती चहा, दालचिनी इत्यादी पाण्यामध्ये उकळून लिंबू पिळून/ न पिळता घ्यावे. घशामध्ये वेदना होणं, आवाज बसणे इत्यादीमध्ये तर जास्त वेळा घेण्यास हरकत नाही. गरमागरम चहा थर्मासमध्ये भरून ठेवावा. दिवसभर एक एक घोट घ्यावा.

सोयाबीन कॉफी – सोयाबीन (दाणे) खूप जास्त वेळ कोरडे भाजावे. काही वेळानंतर कॉफीसारखा वास सुटतो. नंतर ते दाणे मिक्सरमध्ये बारीक करून पूड करून ठेवावे. कॉफी ऐवजी ही पूड वापरून कॉफी करावी. रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांसाठी, मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांसाठी जास्त उपयोगी.

‘अति सर्वत्र वर्जयेत्’ या उक्तीप्रमाणे जे जे जास्त (अति) प्रमाणात सेवन होते ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. चहा, कॉफी  पावसाळ्यामध्ये जरूर घ्यावे. पण प्रमाणात घ्यावे. जास्त प्रमाणात घेतल्याने पित्ताचा त्रास, डोकेदुखी, अपचन, मलावष्टंम इत्यादी अनेक त्रास होऊ शकतात. म्हणून चहा, कॉफी घेताना प्रमाणातच घ्यावी.

 

डॉ. सारिका सातव, (आहारतज्ञ)

इमेल- dr.sarikasatav@rediffmail.com