साठवलेल्या वस्तू काही काळाने जुन्यापुराण्या वाटू लागतात, आठवणींचेही असेच होते का?

मांडणा हा राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कलाप्रकार असून आपल्याकडील रांगोळीशी याचे बरेचसे साधम्र्य आहे. गेरूने सारवून आपल्याकडे जशी रांगोळी काढली जाते तसाच गेरूने सारवलेल्या जमिनीवर चुन्याच्या माध्यमातून मांडणा चितारला जातो. सुरुवातीच्या या मांडणाच्या रूपानंतर त्यात आधुनिक काळात पोहोचेपर्यंत अनेक बदल झाले आहेत. आता तर भिंतींवरही मांडणा चितारला जातो अन् कॅनव्हॉसवरही! असे असले तरी मांडणाचे मूळ केवळ नक्षीकाम नाही. मांडणा याचा अर्थ शोध घेणे असा आहे. या मांडणाच्या माध्यमातून अनेकविध गोष्टींचा शोध घेण्याची परंपरा होती. आता केवळ तो एक कलाप्रकार होऊन राहिला आहे. प्रसिद्ध अमेरिकन कलावंत माईक केलीच्या कलाकृती पाहून आपल्याकडील मांडणा कलाप्रकाराची सहज आठवण झाली.

माईकच्या सर्व कलाकृती आठवणींशी संबंधित आहेत. या सर्वच कलाकृतींमध्ये नानाविध आकारांच्या तेवढेच वैविध्य असलेल्या वस्तू एका फ्रेममध्ये पाहायला मिळतात. मिठागरांमधून वाफे तयार करून जशी मीठशेती केली जाते, काहीसे त्याचप्रमाणे. इथे या फ्रेम्स त्या वाफ्याचे काम करीत असून त्यामधील सिमेंटमध्ये काही वस्तू ठेवलेल्या होत्या. सिमेंट सुकल्यानंतर त्या पक्क्या झाल्या, ती फ्रेम म्हणजेच माईकच्या कलाकृती.

प्रत्येक कलाकृतीमध्ये काही ना काही पक्के झालेले आहे. काहींमध्ये विविध प्रकारची फ्रॉक, शर्ट, पँट आदींसाठी वापरली जाणारी बटणं आहेत. त्यात ते काय वैविध्य असणार, असा प्रश्न एखाद्याला पडलेला असेल तर माईकच्या या कलाकृती पाहायलाच हव्यात. मग मोतिया बटण, लेस असलेले बटण, गुंडी असे बटणांचे नानाविध प्रकार पाहून थक्क व्हायला होते.

दुसऱ्या एका चौकटीमध्ये असंख्य मेडल्स, कीचेन्स, गळ्यात घालायच्या चेन्स, हातातील चेन्स, त्यामध्येच आलेला एक छोटेखानी पाइप, छातीवर मिरवण्यासाठी वापरली जाणारी बक्कले अशा बक्कळ गोष्टी पाहायला मिळतात. यात मग विविध प्रकारच्या पिना, सुया अशा असंख्य गोष्टीही नजरेस पडतात. या कलाकृतींचा विशेष म्हणजे या अनेक फ्रेम्स पाहिल्यानंतर असे लक्षात येते की, आपणही यातील अनेक गोष्टी, अनेक वस्तू अनुभवलेल्या तरी आहेत किंवा मग जमवलेल्या तरी! ..आपल्याच आयुष्यातील अनेक स्मृती जाग्या होतात. काही वेळेस त्या स्मृतींमध्ये आपण रमूनही जातो. खरे तर या सर्व फ्रेम्स किंवा कलाकृती म्हणजे स्मृतिचित्रे किंवा ‘आठवणींचे वाफे’च आहेत. खरेच नाही का, काही वेळेस दीर्घकाळ राहिलेल्या किंवा जपून ठेवलेल्या स्मृतीही, वाफेसारख्याच उडून जातात आणि कळतही नाही. बऱ्याच काळानंतर त्याची जाणीव होते. पण तेव्हा बरेच काही निसटून गेलेले असते!

ही स्मृतिचित्रे व्यवस्थित पाहिली तर लक्षात येते की, त्या स्मृती ज्या माणसाशी संबंधित आहेत, त्याचे व्यक्तिमत्त्वच या फ्रेम्स उलगडत जातात. त्या व्यक्तीची अभिरुची मग त्या वस्तूपासून रंगांपर्यंत आणि आकारापासून आवडीपर्यंत सारे काही आले; तेच सारे, ही चित्रे आपल्यासमोर मांडतात. हे लक्षात येते त्याच वेळेस आपल्याला दोन गोष्टींची जाणीव झालेली असते. हा ‘आठवणींचा मांडणा’ आहे आणि ‘मांडणा’मध्ये अपेक्षित असलेला शोध आपण म्हणजेच रसिक त्या कलाकृतीच्या माध्यमातून घेत असतो.

अनेकदा होते असे की, माणसाचे वय वाढत गेले की त्याचबरोबर आपणच साठवलेल्या वस्तू आपल्याला जुन्यापुराण्या वाटू लागतात आणि मग त्या आपण फेकून देतो. पण त्याच वेळेस नवे काही तरी जमविण्याचे वेड लागलेले असते किंवा मग नवीन गरज निर्माण झालेली असते. आठवणींचेही असेच होते का? कदाचित हेच तर सांगण्याचा प्रयत्न या माईकच्या या समकालीन कलाकृती करताहेत का?

विनायक परब vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab