परीक्षा सुरू झाली तरी बारावीच्या मुलांची साडेसाती संपण्याची चिन्हे नाहीत. या विद्यार्थ्यांना रोज नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. सरकारचे दुर्लक्ष, मंडळाचा अजागळ कारभार आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बेपर्वा वृत्ती याचा एकत्रित परिणाम बारावीच्या परीक्षांवर होत असून मुलांचे अभ्यासाकडे लक्ष लागणे अवघड झाले आहे. बारावी ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा. मुलांच्या करिअरची दारे या परीक्षेतून उघडतात. सध्याच्या स्पर्धाशील युगात करिअरबद्दल सजग राहणे मुलांसाठी अत्यावश्यक असते. बारावीची संधी हुकली की हाती येईल तो मार्ग धरून आयुष्यभर वाटचाल करावी लागते. आपल्या शिक्षण व्यवस्थेतील मोठी गैरसोय म्हणजे पुढील आयुष्यात नव्याने काही शिकता येत नाही. काही ठरावीक विषय हौस म्हणून शिकता येतात. परदेशात पन्नाशीतसुद्धा नवे करिअर, नवे शिक्षण घेऊन सुरू करता येते. भारतात तसे नाही. यामुळेच बारावीच्या परीक्षेला अतोनात महत्त्व मिळते. मुलांच्या आयुष्यातील या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन काळजीपूर्वक विचार करून सरकार व मंडळाने काही निर्णय घ्यायला हवे होते. तसे झाले नाही. महाराष्ट्रातील मुले स्पर्धेत मागे पडू नयेत म्हणून सीबीएसईच्या स्तरावर बारावीचा अभ्यासक्रम नेण्यात आला. तशी खरोखर गरज होती का, हा वादाचा मुद्दा आहे. सरसकट अभ्यासक्रम कठीण न करता विद्यार्थ्यांना पर्याय देता आले असते. परंतु एकदा अभ्यासक्रम कठीण केल्यावर सीबीएसईप्रमाणे, म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळेल असे पाहून, परीक्षेचे वेळापत्रक करायला हवे होते. शिक्षण क्षेत्रात काम करूनही दूरदृष्टीचा पुरता अभाव असल्यामुळे मंडळाला विद्यार्थ्यांची ही गरज लक्षातच आली नाही. यावर ओरड होताच आमच्या परीक्षेला लाखांनी विद्यार्थी बसतात असली उत्तरे बोर्डाकडून येऊ लागली. शेवटी हा प्रश्न राजकीय पातळीवर गेला आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वेळापत्रक बदलले. परंतु हा बदलही काळजीपूर्वक केला गेला नाही. परिणामी मुलांचा त्रास अधिकच वाढला आणि आधीचा गोंधळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. आताही विज्ञानाच्या विद्यार्थ्यांची सोय पाहताना कला शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. गणित व अर्थशास्त्र अशा कठीण विषयांची परीक्षा लागोपाठच्या दिवशी ठेवण्यात आली आहे. हा गोंधळ आता निस्तरणे शक्य नसल्याने कला शाखेतून गणित व अर्थशास्त्र परीक्षा देणाऱ्यांना दोन दिवसांत अभ्यासाचा निपटारा करावा लागेल. वेळापत्रकाच्या या गोंधळात प्रथम शिक्षकांच्या आणि नंतर शिक्षकेतरांच्या आंदोलनाची भर पडली. यापैकी शिक्षकांचे आंदोलन बुधवारी मागे घेण्यात आले असले तरी शिक्षकेतरांचे सुरू राहिल्याने अनेक महाविद्यालयांतील बारावीच्या प्रयोग व तोंडी परीक्षा रखडल्या. संघटित झुंडशाहीचे लोण आता शिक्षकांमध्येही पसरू लागले असल्याने मुलांना आपण वेठीस धरीत आहोत ही जाणीव त्यांच्यात राहिलेली नाही. तथापि, याबद्दल फक्त शिक्षकांनाही दोष देता येत नाही. कुणाला तरी वेठीस धरल्याशिवाय निगरगट्ट सरकारला जाग येत नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही हीच अडचण आहे. परीक्षांवर परिणाम करून दाखविल्याशिवाय सरकार चर्चेलाही पुढे येत नाही, असा अनुभव असल्यामुळे वेठीस धरण्याची वृत्ती सर्वत्र फोफावत आहे. बारावी परीक्षांवर परिणाम करणाऱ्या सर्व संभाव्य शक्यतांचा विचार करून सरकार व मंडळाने निर्णय घेतले असते तर परीक्षा सुरळीत पार पडल्या असत्या व विद्यार्थ्यांनाही शांतपणे अभ्यास करता आला असता. विनाकारण विद्यार्थ्यांमागे नष्टचर्य लागले व त्याला सरकार, मंडळ व शिक्षक जबाबदार आहेत.