जे सावतामाळी वारीला न जाता शेतातच विठूमाईला पहात होते तेच ‘करी संसाराची बोहरी। इतकुें मागतों श्रीहरी’, असं आणि जे तुकाराम महाराज ‘जोडुनिया धन उत्तम वेव्हारे’, असं सांगत होते तेच ‘नको देऊं देवा द्रव्य आणि भाग्य’ असं फकिरीचं मागणं का मागतात? किंवा खरंच ते असं मागणं मागतात का, असा प्रश्न ज्ञानेंद्रनं उपस्थित केला. त्यावर हृदयेंद्र म्हणाला..
हृदयेंद्र – व्यवहारातही पहा, ज्याला शिखर गाठायचं असतं त्याला पायथ्याशी रेंगाळून चालत नाही. पायथ्यापर्यंत मित्रपरिवार असेल, डोंगर चढतानाही काहींची सोबत असेल, पण अखेरचा सुळका येतो तेव्हा एकटय़ालाच तो सर करावा लागतो.. अध्यात्माचं शिखर ज्याला गाठायचं आहे त्यालाही दुनियेच्या पायथ्याशी रेंगाळून चालणारच नाही.
ज्ञानेंद्र – पण व्यवहारात शिखर सर केलेला माणूस काही शिखरावरच कायमचा राहात नाही..
कर्मेद्र – तो खाली येतोच आणि कसं शिखर सरं केलं, याच्या मुलाखतीही देत सुटतो!
ज्ञानेंद्र – निसर्गदत्त महाराजांनाही एकानं विचारलं की जेव्हा जगात सर्वत्र आनंद निर्माण होईल, त्यानंतर काय होईल? तर ते हसून म्हणाले, ‘‘शिखरावर गेल्यावर काय होतं? परत घसरणच ना!’’ तुमचे तथाकथित साक्षात्कारी पुरुषही शिखर म्हणूनच घसरतात ना?
हृदयेंद्र – इथे शिखर हे रूपक म्हणून पाहा..
कर्मेद्र – अरे वा! मुद्दा सुचला नाही की रुपकांची ढाल वापरायचा धूर्तपणा का?
हृदयेंद्र – धूर्तपणा नाही.. आध्यात्मिक शिखर गाठलेला प्रत्येकजण काही घसरत नाही. असे अनेक संत होऊन गेलेच की. त्यांची मनोवस्था या अभंगात आहे, एवढय़ापुरतं मी रुपक वापरलं.. शिखर गाठायचं आहे, त्याला पायथ्याशी रेंगाळता येत नाहीच, पण ओझंही जवळ बाळगता येत नाही! अध्यात्माचं शिखरही जो मीपणानं गाठू पाहातो, तोच शिखर सर केल्याच्या भ्रमात मीपणानंच वागू लागतो आणि तोच घसरतो..
बुवा – आणि म्हणून मी जे गेल्यावेळी म्हणालो ना, की माझा खरा धुरीण कोण आहे, हे कळत नाही तोवर सारे प्रयत्न, मग ते व्यवहारातले असोत की अध्यात्मातले असोत, मीपणानंच होतात. माझ्या जीवनाचा मीच धुरीण आहे, या भ्रमात मी असतो!
कर्मेद्र – पण जीवनाचं सूत्रं आपल्याच हातात तर असतं..
बुवा – नीट विचार करा, मग लक्षात येईल, सूत्रं नव्हे केवळ प्रयत्न आपल्या हातात असतात. फळ आपल्या हातात नसतं. हे लक्षात आलं तर प्रयत्न करतानाही मन विचलित होणार नाही. जे घडेल ते स्वीकारून पुढे जाता येईल.. मग धुरीण मी नाही, म्हणजे काय? तर मी कितीही उपासना केली, तरी शिखर सर होत नाही, हे लक्षात आलं की हा ‘मी केली’ या भावातलीच खोट जाणवते. मग तळमळ लागते. ती तळमळच काम करते.. या तळमळीतूनच सावता माळी महाराज आळवणी करीत आहेत की, हे पांडुरंगा तूच खरा धुरीण आहेस. आता माझी विनवणी सत्वर ऐक..
हृदयेंद्र – ‘अवध रामायण’मधला प्रसंग आठवतो. लंकेत जाण्यासाठी प्रभूंना सेतु बांधायचा असतो तेव्हा सागर प्रकट होऊन सांगतो की, ‘‘हे श्रीरामा या वानरसेनेत नल आणि नील हे दोन वीरवानर आहेत. लहानपणी ऋषीमुनी ध्यानाला बसत तेव्हा त्यांच्या देवमूर्ती हे दोघं माझ्या पाण्यात टाकून देत. तुमच्या अवतारकार्यातील या दोघांचं स्थान लक्षात घेऊन त्या ऋषींनी त्यांना शापाच्या रूपात आशीर्वाद दिला. तो असा की तुम्ही दोघे पाण्यात टाकाल ते दगड बुडणार नाहीत!’’ तेव्हा दगड स्पर्शून ते पाण्यात टाकायची सेवा प्रभूंनी या दोघांना दिली. पाहाता पाहात सेतु होऊ लागला आणि दोघांच्या मनात अहंभाव आला की आमच्यामुळे सेतु होत आहे! प्रभू हसले. लगेच मोठमोठय़ा लाटांनी हे शिलाखंड विखरू लागले. हताश होऊन त्यांनी प्रभूंना विनवणी केली. तेव्हा प्रभूंच्या आज्ञेनुसार एका दगडावर ‘रा’ आणि दुसऱ्या दगडावर ‘म’ लिहून ते पाण्यात टाकले तेव्हा हे दगड एकसंध राहू लागले आणि सेतु झाला! तसंच आहे हे. मीपणानं केलेली उपासना संसाराच्या झंझावातात टिकत नाही आणि त्यामुळे या घडीला लंकारूपी असलेल्या हृदयाशी जोडणारा भावाचा सेतु बांधला जात नाही!
ज्ञानेंद्र – पण माझा मूळ प्रश्न निरुत्तरितच राहिला. आपल्या कामातच विठूला पाहणारे सावता माळी फकिरीचं मागणं का मागतात आणि खरंच मागतात का?
-चैतन्य प्रेम